जोडोनिया 'कर'; तोटा झाल्यास ‘रिफंड’ची भरपाई - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 29, 2021

जोडोनिया 'कर'; तोटा झाल्यास ‘रिफंड’ची भरपाई

https://ift.tt/3cXjSzF
सीए संजीव गोखले, मुंबई : जर माझे दोन व्यवसाय असतील आणि एका व्यवसायात नुकसान झाले तर हे नुकसान दुसऱ्या व्यवसायातील नफ्यासमोर वर्ग (सेट ऑफ) करता येते. हाच नियम दोन घरांना आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाला लागतो. गृहकर्ज व्याजामुळे एका घरातून तोटा झाला आणि दुसऱ्या घरातून उत्पन्न भाड्याचे असेल, तर हा तोटा भाड्याच्या उत्पन्नातून वर्ग किंवा वजा करून निव्वळ भाडे करपात्र धरले जाते. भांडवली नफ्याबाबतही हाच नियम आहे. मात्र, येथे थोडा फरक आहे. दीर्घकालीन भांडवली तोट्यासमोर अल्पकालीन वर्ग करता येत नाही; तसेच सट्टा व्यवहारातून (स्पेक्युलेशन) झालेला तोटा इतर व्यवसायाच्या नफ्यातून वजा करता येत नाही. प्राप्तिकर कायदा अजून एक सवलत देतो, ती म्हणजे माझ्या एकाच व्यवसायात तोटा झाला असेल, तर हा तोटा त्या वर्षीच्या इतर उत्पन्नासमोर वर्ग करता येतो. उदाहरणार्थ, व्यवसायातील एक लाख रुपयांचा तोटा. हा तोटा तीन लाख रुपये भाडे उत्पन्नातून वजा करता येतो आणि भाड्याचे करपात्र उत्पन्न केवळ दोन लाख रुपये दाखवता येते. या नियमाला अपवाद म्हणजे व्यवसाय किंवा धंद्यातील तोटा वेतनाच्या उत्पन्नासमोर वर्ग किंवा वजा करता येत नाही; तसेच भांडवली तोटा इतर कोणत्याही उत्पन्नासमोर वजा करता येत नाही. मग, असा न वर्ग केलेला कोणताही तोटा मात्र पुढील वर्षासाठी वर्ग करता येतो किंवा कॅरी फॉरवर्ड करता येतो. समजा, मला फक्त दीर्घकालीन भांडवली तोटा झाला आहे आणि तो इतर उत्पन्नासमोर वजा करता येत नाही; तर अशा वेळी तो पुढील वर्षाकरता वर्ग करून पुढील वर्षात जर दीर्घकालीन भांडवली नफा झाला तर त्यासमोर तोटा वजा करता येईल. यासाठी महत्त्वाची अट म्हणजे विवरणपत्रात हा तोटा दाखवून तो पुढील वर्षासाठी वर्ग करत आहे, हे व्यवस्थितपणे दाखवणे आणि विवरणपत्र मुदतीत भरणे गरजेचे आहे. एकदा का हा तोटा पुढील वर्षासाठी वर्ग केला की, पुढील वर्षातील केवळ याच प्रकारच्या उत्पन्नासमोर तो वजा करता येतो. उदाहरणार्थ, व्यवसायातील तोटा पुढील वर्षी केवळ व्यवसायातील नफ्यासमोर वजा करता येतो. घरभाड्यासमोर करता येत नाही. व्यवसाय कोणताही असेल तरी चालेल. अशा रितीने तोटा पुढील आठ वर्षे वर्ग करून त्यामधील नफ्यासमोर वजा करता येतो. थोडक्यात, नुकसान किंवा तोटा आपला प्राप्तिकर वाचवू शकतात. त्यासाठी विवरणपत्रात योग्य माहिती देणे आवश्यक आहे.