
अलवर: राजस्थानमधील जिल्ह्यात एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओही काढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला सहा महिने ब्लॅकमेल केले. एका अन्य तरुणानेही तिच्यावर अत्याचार केले. आरोपीने तिच्या लहान भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. अनेक महिन्यांपासून आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय १६ नोव्हेंबर रोजी रामगढ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर आरोपीने तिच्या घरी जाऊन मारहाण केली. त्यानंतर पीडित कुटुंब अलवर पोलीस अधीक्षकांना जाऊन भेटले. पोलीस अधीक्षकांच्या आदेशांनंतर पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास रामगढ पोलिसांकडे सोपवण्यात आला. आरोपी तिला गुंगीच्या गोळ्या खायला देऊन तिच्यावर अत्याचार करायचा. त्याने या दुष्कृत्याचा व्हिडिओही काढला होता. त्याने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. अनेक महिन्यांपासून तो लैंगिक अत्याचार करत आहे, असे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पीडितेच्या काकांनी तक्रार दाखल केली. तिचे कुटुंब भाडेतत्वावर खोली घेऊन राहत होते. त्यात घरात मालकही राहायचा. आरोपीने एके दिवशी पीडिता खोलीत एकटी असताना, तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. याबाबत कुठेही वाच्यता केली तर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला वारंवार धमकावून आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता, असेही तिने सांगितले.