वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून 'तलाठ्या'ची आत्महत्या, नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 29, 2021

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून 'तलाठ्या'ची आत्महत्या, नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

https://ift.tt/3FV1SCv
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत चुकीचे काम करण्यासाठी येणारा दबाव आणि जाचाला कंटाळून अप्पर तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागात कार्यरत एका तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण नामदेव बोराटे (वय ३८, रा. कोळेकर गल्ली, सातारा परिसर) असे या तलाठ्याचे नाव आहे. तर आत्महत्येचा घटनेनंतर गुन्हा नोंदवण्यासाठी नातेवाईक पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, बोराटे हे आवक- जावक विभागात कार्यरत होते. मात्र तेथे काम करतांना त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात येत होता, असे आरोप नातेवाइकांनी केला आहे. गेली अनेक दिवस बोराटे वरिष्ठांचा छळ सहन करत होते, मात्र गेली काही दिवसात हे प्रमाण अधिकच वाढल्याने कंटाळून त्यांनी गळफास घेतला, असा दावाही नातेवाईकांनी केला. बोराटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, ज्यात ११ ते १२ अधिकाऱ्यांचे नाव आहेत. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली असून नाव सांगण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बचाव करत असल्याचा आरोप बोराटे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. राजीनामाही दिला होता... लक्ष्मण बोराटे यांच्यावर चुकीच्या कामासाठी वरिष्ठ अधिकारी नेहमीच दबाव आणत होते. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात असतांना खूप त्रास देण्यात आला. त्यामुळे त्यांनी वैतागून राजीनामा दिला होता. पण राजीनामा फेटाळून त्यांची आवक-जावक विभागात बदली करण्यात आली.पण येथेही त्रास कमी झाला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असे बोराटे यांच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.