
अहमदनगर: नगर शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महानगरपालिकेने प्रयोगिक तत्वावर ऐतिहासिक वास्तूंना भेटी देण्यासाठी मोफत बससेवा सुरू केली होती. ठरल्याप्रमाणे महिनाभर राबविण्यात आलेल्या या सेवेला पर्यटक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महिन्यानंतर बंद झालेली ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत असली तर महापालिकेने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. नगरच्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पर्यटनदिनाचे औचित्य साधून ही घोषणा केली होती. त्यानुसार २ ऑक्टोबर २०२१ पासून या सेवेला सुरुवात करण्यात आली. एक महिना प्रयोग करायचा आणि त्यानंतर पुढील निर्णय घ्यायचा असे ठरले होते. अशा प्रकारे ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी महापालिकेने मोफत बससेवा उपलब्ध करून देण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. वाचा: या उपक्रमाचे संयोजक प्रसिद्धी विभाग आणि उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान यांनी सांगितले की, ‘प्रत्येक शनिवारी व रविवारी ही सेवा देण्यात आली. बसची क्षमता ३५ प्रवाशांची होती. प्रयोग काळात बसच्या दहा फेऱ्या झाल्या. सुमारे ३०० ते ३५० प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. पर्यटकांना मार्गदर्शक म्हणून भूषण देशमुख, अमोल बास्कर, प्रा. नवनाथ वाव्हळ, पंकज मेहेर, सतीश गुगळे महिती देत. त्यामुळे नागरिक आणि अभ्यासकांना नगरमधील ऐतिहासिक स्थळांची नव्याने ओळख होण्यास मदत झाली. नगरमधील नागरिक, इतिहासाचे अभ्यासक आणि बाहेरून आलेले पर्यटक यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू करावी, अशी शिफारस आम्ही प्रशासनाकडे केली आहे.’ वाचा: ही सेवा मोफत असली तरी यासाठी आधी बुकिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी ९८५०१४६६११ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले. त्यानंतर क्षमतेनुसार नागरिकांना त्यांची फेरी केव्हा असेल यासह पुढील सूचना दिल्या जातात. आता करोनाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. आता एक नव्हे तर दर आठवड्याला दोन बस सुरू केल्या तरीही प्रतिसाद मिळू शकले. नगरच नव्हे तर अन्य ठिकाणांहूनही नागरिकांकडून यासंबंधी चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.