
म. टा. खास प्रतिनिधी, दक्षिण मुंबईतील माझगाव ते नवी मुंबईतील बेलापूरदरम्यान सेवा लवकरच सुरू होत आहे. या मार्गाची चाचणी यशस्वी झाली आहे. आता प्राथमिक तत्वावरील (पायलट) चाचणी सुरू होत आहे. या जलमार्गामुळे मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आहे. केंद्रीय जलमार्ग व जहाज बांधणी मंत्रालयाने सहा महिन्यांपूर्वी मुंबईला नवी मुंबई व कोकणशी जलमार्गे जोडण्यासाठी सहा नव्या मार्गांना परवानगी दिली होती. मुंबईहून मुंबई पोर्ट ट्रस्टअंतर्गत या सेवा सुरू होत आहे. तर महाराष्ट्र मेरिटाइम मंडळाचे त्याला सहकार्य आहे. याअंतर्गतच माझगाव ते बेलापूरदरम्यान प्राथमिक फेरी ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात सुरू झाली. या संबंधित सूत्रांनी सांगितले की, 'या मार्गावरील चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता लवकरच प्राथमिक चाचणी सुरू होत आहे. ही कॅटामरान श्रेणीतील सेवा असेल. त्यामध्ये एका वेळी ६५ ते ७० प्रवासी प्रवास करू शकतील. माझगाव येथील देशांतर्गत क्रुझ टर्मिनलवरून ही सेवा सुरू होईल. तर बेलापूर येथील जेट्टीचे कामदेखील पूर्ण झाले आहे.' एरव्ही माझगाव किंवा मुंबई बेट (दक्षिण मुंबई) येथून नवी मुंबईत रस्त्याने पोहोचण्यासाठी किमान दोन तासांचा तर रेल्वेमार्गे दीड तासांचा अवधी लागतो. यामार्गे प्रवास केल्यास अधिकाधिक ४५ मिनिटांचाच अवधी लागेल. प्राथमिक स्तरावरील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या सेवेसाठी स्वतंत्र कंपनी नेमली जाईल. त्याखेरीज जलद गतीने प्रवास करणाऱ्या लॉन्चरदेखील असतील. त्याचे भाडे अधिक असेल. त्यात १० ते १५ प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतील, असे सूत्रांनी सांगितले.