
मुंबई : नफावसुलीचा जोर कायम असलयाने आज गुरुवारी भांडवली बाजारात मोठी पडझड झाली. आज मुंबई शेअर बाजारचा सेन्सेक्स ३७२ अंकांनी घसरला आणि ५९६३६ अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३३ अंकाच्या घसरणीसह १७७६४ अंकावर बंद झाला. या पडझडीत गुंतवणूकदारांना १.८८ लाख कोटींचा फटका बसला. आजच्या सत्रात सार्वजनिक बँका वगळता सर्वच क्षेत्रात चौफेर विक्रीचा सपाटा दिसून आला. धातू आणि वाहन उद्योगात मोठी पडझड झाली. त्याशिवाय मिडकॅप स्मॉल कॅप शेअरमध्ये नफावसुली दिसून आली. आजच्या पडझडीनंतर बीएसईवर बाजार भांडवल २६९.१९ लाख कोटींपर्यंत खाली आले. त्यात १.८८ लाख कोटीची घसरण झाली. आज वेदांताचा शेअर ८ टक्क्यांनी घसरला. आजच भांडवली बाजारात प्रवेश करणारा पेटीएमचा वन ९७ कम्युनिकेशनचा शेअर तब्बल २७ टक्के कोसळला. यातून आयपीओमध्ये शेअर प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांना प्रचंड फटका बसला. बाजारात एसबीआय, इंडियन ऑइल, एचडीएफसी बँक, पॉवरग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचयूएल, डिव्हीज लॅब हे शेअर तेजीसह वधारले. महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एल अँड टी , आयशर मोटर्स, टाटा स्टील, इंडसइंड बँक, हिरो मोटोकॉर्प, डॉ. रेड्डी लॅब या शेअरमध्ये घसरण झाली.निफ्टी ऑटो इंडेक्समध्ये सर्वाधिक २.६१ टक्के घसरण झाली. त्याखालोखाल निफ्टी मेटल इंडेक्स २.५९ टक्क्यांनी घसरला. निफ्टी मीडिया आणि निफ्टी रियल्टी या दोन्ही निर्देशांकात देखील मोठी घसरण झाली. जागतिक बाजारातील नकारत्मक संकेत, कच्च्या तेलातील दरवाढ आणि त्यामुळे महागाईची टांगती तलवार या घटकांचा आज परिणाम दिसून आला. सणासुदीत वाहन विक्री तुलनेने कमीच झाल्याने बाजारात मंदीचा प्रभाव कायम असल्याचे दिसून येते यामुळे आज बाजारात नफावसुली झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले.