
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली असली तरी पेट्रोल आणि डिझेल दरांबाबत तूर्त जैसे थे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आज बुधवारी सलग २७ व्या दिवशी पेट्रोल आणि स्थिर ठेवले आहेत. आज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपये इतके आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये कायम आहे. केंद्र सरकारने दिवाळीत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. परिणामी पेट्रोल सरासरी ५ रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले होते. जवळपास २३ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांनी इंधनावरील मूल्यवर्धीत करात कपात केली आहे. मात्र महाराष्ट्रासह बिगर भाजपशासित राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी केला नाही. त्यामुळे या राज्यात पेट्रोल अजूनही १०० रुपयांवर मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा घातक विषाणू आढळून आल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली होती. या वृत्तानंतर कमॉडिटी बाजारात शुक्रवारी मोठी पडझड झाली होती. मात्र त्यातून सावरले आहेत. जागतिक कमॉडिटी बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. ओमिक्रॉनचे संकट आणि तेलाचे विद्यमान उत्पादन याबाबत ओपेक समूहाची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज तेलाचा भाव वाढला. ब्रेंट क्रूडचा भाव १.५ टक्क्यांनी वधारून ७०.२४ डॉलर प्रती बॅरल झाला. त्यापूर्वी मंगळवारी ब्रेंट क्रूडचा भाव ५.४ टक्क्यांनी घसरला होता. यूएस क्रूडचा भाव १.२ टक्क्यांनी वधारून ६६.९६ डॉलर प्रती बॅरल झाला.