शिवसेनेचं ठरलं, संजय राऊतांना पुन्हा राज्यसभेत पाठवायचं, फॉर्म भरण्याची तारीखही निश्चित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 21, 2022

शिवसेनेचं ठरलं, संजय राऊतांना पुन्हा राज्यसभेत पाठवायचं, फॉर्म भरण्याची तारीखही निश्चित

https://ift.tt/4I9pB0g
मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेसाठीचे कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार?, याबाबत सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुणाला संधी देणार, याबद्दल राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होतीये. अशातच शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार यांना पुन्हा एकदा शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. संजय राऊत 26 मे रोजी आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आतापर्यंत सलग तीन वेळा राऊतांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. निवड पात्र झाल्यास राऊतांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर सलग चौथ्यांदा जाण्याचा मान मिळणार आहे. राज्यसभेतून महाराष्ट्राचे भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम असे सहा सदस्य ४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. याच जागांसहित १५ राज्यातील राज्यसभेवर रिक्त होणाऱ्या ५७ खासदारांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार आणि महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता भाजपचे दोन उमेदवार तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. उर्वरित सहाव्या जागेसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठी चुरस बघायला मिळेल. म्हणून राऊत विजयाचा चौकार मारणार हे निश्चित...! शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्या खासदारकीची मुदत संपणार असली तरी त्यांची पुन्हा राज्यसभेवर नियुक्ती होणार, हे निश्चित मानलं जातंय. कारण महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यापासून ते प्रत्येकी वेळी भाजपला अंगावर घेण्याचं काम संजय राऊत निडरपणे करतायेत. भाजपचा प्रत्येक हल्ला परतावून लावण्याचं काम शिवसेनेकडून राऊत नित्य नियमाने करत आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापनेत त्यांचा असलेला वाटा आणि तिन्ही पक्षांमधील वेळोवेळी समन्वयाची गरज ओळखून राऊत त्या त्या वेळी पुढे येतायत. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संसार थाटून शिवसेनेने भाजपला शिंगावर घेतलं आहे. शिवसेना सातत्याने मोदी सरकारवर तोफ डागत आहे. मैदानी सभांमधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे भाजपवर बरसत आहेत तर राज्यसभेतून संजय राऊत मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून प्रहार करत आहेत. राज्यसभेतील शिवसेनेचा चेहरा म्हणून संजय राऊत यांची ओळख आहे. लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची एकजूट, विरोधी पक्षांच्या गटातले शिवसेनेचे स्थान तसेच भूमिका मांडण्याची जबाबदारी राऊतांच्या खांद्यावर असेल. त्याचमुळे राऊतांचं राज्यसभेत असणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे पक्ष कोणताही विचार न करता राऊतांना राज्यसभेवर पाठवून त्यांचा राज्यसभेचा विजयी चौकार लागणार हे निश्चित. तसेच संख्याबळानुसार राज्यसभेवर जाण्यासाठी राऊतांना कोणताही धोका नसल्याने राऊतांच्या नावासमोर पुन्हा राज्यसभा खासदार लागणार, हे देखील निश्चित..!