रुपयाने गाठला ऐतिहासिक निचांकी दर; 'ही' आहेत कारण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 20, 2022

रुपयाने गाठला ऐतिहासिक निचांकी दर; 'ही' आहेत कारण

https://ift.tt/DJHirGB
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः विदेशी गुंतवणूकदार सातत्याने देशातील बाजारांतून निधी काढून घेत आहेत; तसेच देशातील शेअर बाजारांत पडझड सुरू आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून गुरुवारी भारतीय रुपया आजवरच्या नीचांकी पातळीवर गेला. विदेशी चलन बाजार बंद होताना रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत दहा पैशांनी घसरला आणि ७७.७२ या नव्या नीचांकी पातळीवर गेला. आंतरबँक विदेशी चलन बाजारात रुपया ७७.७२ या पातळीवर उघडला. त्यानंतर दिवसभरातील चढ-उतारांचा सामना करून बाजार बंद होताना तो बुधवारच्या पातळीपेक्षा १० पैसे घसरून ७७.७२ वर बंद झाला. दिवसभरात रुपयाने ७७.७६ इतकी नीचांकी, तर ७७.६३ इतकी उच्चांकी पातळी गाठली होती. बुधवारी रुपया १७ पैशांनी घसरून ७७.६१वर बंद झाला होता. जगातील सहा चलनांचा बनलेला डॉलर निर्देशांक ०.२८ टक्के खालच्या पातळीवर येऊन १०३.५१ वर बंद झाला. देशातील; तसेच जगभरातील शेअर बाजारांत समभागविक्रीचा जोर दिसून आला. अमेरिकेच्या आर्थिक विकासाची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमी आल्यामुळे डॉलरवरही परिणाम दिसून आला आहे. रुपयावरही त्यामुळे परिणाम झाला आहे. - गौरांग सोमय्या, विदेशी चलन विश्लेषक, मोतिलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस रिझर्व्ह बँकेपुढे तीन पर्याय सीए डॉ. योगेश सातपुते यांनी 'मटा'ला सांगितले, की सध्या विदेशी गुंतवणूकदार संस्था देशातील शेअर बाजारातून पैसा काढून घेत आहेत. अशा पद्धतीने देशाबाहेर जाणाऱ्या डॉलरवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण नसते; मात्र रुपया सावरण्यासाठी अशा स्थितीतही रिझर्व्ह बँकेपुढे तीन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे, रिझर्व्ह बँक स्वतःच्या विदेशी चलन गंगाजळीतून डॉलरची विक्री करू शकेल. असे करताना रिझर्व्ह बँकेला डॉलरची गंगाजळी कमी होणार नाही ना, हे पाहावे लागेल. दुसरा पर्याय म्हणजे, डॉलरच्या बदल्यात रुपया असे स्वॅप व्यवहार करून डॉलर बाजारात खेळवला जाऊ शकतो. तिसरा पर्याय म्हणजे आयातीवर बंधने आणून देशाबाहेर जाणारा डॉलर थोपवणे. हा तिसरा पर्याय वापरताना कच्च्या खनिज तेलाच्या आयातीवरील आपले अवलंबित्व अद्याप कमी करणे शक्य झाले नसल्यामुळे हा तिसरा पर्याय रिझर्व्ह बँक चोखाळण्याची शक्यता कमी आहे. तसे केलेच, तर त्यातून फारसे डॉलर वाचण्याची शक्यता नाही, याकडेही डॉ. सातपुते यांनी लक्ष वेधले.