'शरमेने मान खाली घालावी लागेल, असं कोणतंही काम केलं नाही' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 29, 2022

'शरमेने मान खाली घालावी लागेल, असं कोणतंही काम केलं नाही'

https://ift.tt/RWjzwVh
वृत्तसंस्था, राजकोट : 'मागील आठ वर्षांत मी देशसेवेत कोणतीही कसर सोडलेली नाही. तसेच तुम्हाला किंवा देशातील कोणत्याही व्यक्तीला शरमेने मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही काम मी करू दिलेले नाही किंवा वैयक्तिकरित्या तसे काम केलेले नाही', असे प्रतिपादन यांनी शनिवारी केले. २६ मे रोजी पंतप्रधानपदाची आठ वर्षे पूर्ण करणाऱ्या मोदींच्या हस्ते गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील अटकोट शहरात २०० खाटांच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतरच्या सभेत ते बोलत होते. मागील आठ वर्षांत सरकारने गरिबांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न केला. सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांच्या माध्यमातून आम्ही त्यांची सेवा केली आणि त्यांचे जीवन अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. 'आमच्या सरकारच्या कार्यकाळात तीन कोटी कुटुंबांना पक्की घरे देण्यात आली. १० कोटी कुटुंबांना सुविधा देऊन उघड्यावर शौचास जाण्यापासून परावृत्त करण्यात आले. एलपीजी कनेक्शन देऊन नऊ कोटी महिलांची धुराच्या विपरित परिणामांपासून सुटका करण्यात आली. अडीच कोटी कुटुंबांना वीजजोडणी पुरवण्यात आली, तर सहा कोटी कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली. याशिवाय प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत (पीएमजेएवाय) ५० कोटींहून अधिक नागरिकांवर मोफत उपचार करण्यात आले', असे मोदी यांनी नमूद केले. 'हे केवळ आकडे नाहीत, तर देशातील गरिबांना सन्मान मिळवून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विकास और सबका प्रयास' या मूलमंत्राच्या आधारे आम्ही देशाच्या विकासाला एक नवी दिशा दिली', असे ते म्हणाले. 'करोनासंकटात नागरिकांना अन्यधान्याच्या पुरवठ्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे देशातील अन्नधान्याचा साठा आम्ही गरिबांसाठी खुला केला. या कालावधीत आम्ही जन धन बँक खात्याद्वारे महिलांना आर्थिक मदत केली. करोनाची लागण झालेल्यांसाठी आरोग्यसेवा खुल्या केल्या. जेव्हा करोनाप्रतिबंधक लस आली, तेव्हा प्रत्येक भारतीयाला ती मोफत दिली जाईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले', असे मोदी यांनी सांगितले. 'गांधी, पटेलांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा प्रयत्न' 'गेल्या आठ वर्षांत आम्ही महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. गांधींना असा भारत हवा होता, ज्यात गरीब, दलित, आदिवासी आणि महिला सक्षम असतील. जिथे स्वच्छता आणि आरोग्य जीवनाचा भाग असेल व जिथे अर्थव्यवस्था देशी उपाययोजनांवर आधारित असेल. आमच्या सरकारने या सर्व बाबींसाठी अथकपणे काम केले', असे मोदी म्हणाले.