एनएसईप्रकरणी सीबीआयचे मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी छापे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 22, 2022

एनएसईप्रकरणी सीबीआयचे मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी छापे

https://ift.tt/KxNsp3E
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : एनएसई (राष्ट्रीय शेअर बाजार) को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभाग) शनिवारी देशभरातील विविध शहरांत दहापेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकले. मुंबई, गांधीनगर, दिल्ली, नोइडा, गुरुग्राम आणि कोलकाता येथील शेअर दलालांच्या बाराहून अधिक आस्थापनांच्या ठिकाणी हे छापासत्र झाले, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. संध्याकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. सीबीआयने या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच एनएसईच्या माजी सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्ण व समूह संचालन अधिकारी आनंद सुब्रमणियन यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. चित्रा यांच्याकडून राष्ट्रीय शेअर बाजाराच्या व्यवहारांचे संचालन होत असताना २०१० ते २०१५ या कालावधीत ओपीजी सेक्युरिटीजला तब्बल ६७० कार्यालयीन दिवस एनएसईच्या दुय्यम सर्व्हरशी फ्युचर व ऑप्शन या विभागात अवैधपणे जोडणी देण्यात आली होती, असे आत्तापर्यंतच्या तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी ओपीजी सेक्युरिटीजलादेखील आरोपी करण्यात आले आहे. चित्रा रामकृष्ण व सुब्रमणियन यांच्या कार्यकाळात अन्य काही दलालांनादेखील याप्रकारे सर्व्हरची जोडणी देण्यात आली होती व त्यामुळे त्यांना विशेष आर्थिक लाभ झाला, असाही आरोप असून, सीबीआय त्या दिशेने तपास करत आहे. एनएसईच्या सीईओपदी चित्रा यांची २०१३मध्ये नियुक्ती झाली व त्यानंतर त्यांनी सुब्रमणियन यांना समूह संचालन अधिकारी या पदी बढती दिली. सुब्रमणियन यांना वार्षिक ४.२१ कोटी रुपयांचे घसघशीत वेतनही देण्यात आले, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. दिल्लीस्थित ओपीजी सेक्युरिटीजचे मालक व प्रवर्तक संजय गुप्ता यांच्याविरोधात सीबीआयने २०१८मध्येच गुन्हा दाखल केला आहे. शेअर बाजाराच्या दैनंदिन व्यवहारास सुरुवात होण्यापूर्वीच तांत्रिक प्रणालीत प्रवेश मिळवून भरमसाट नफा कमावण्याचा गुप्ता यांच्यावर आरोप आहे.