राज्यसभा निवडणूक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाम!; पवारांचा शिवसेनेला पाठिंबा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 22, 2022

राज्यसभा निवडणूक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाम!; पवारांचा शिवसेनेला पाठिंबा

https://ift.tt/luxVdX1
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : 'राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी हवी असल्यास त्यांनी हातात शिवबंधन बांधावे, मगच त्यांना उमेदवारी देऊ,' अशी भूमिका शिवेसना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री यांनी घेतली आहे. संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिला, तर शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे किंवा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल, असे सूत्रांकडून समजते. राज्यसभेच्या सहा जागांपैकी संख्याबळानुसार भाजपला दोन, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही राजकीय पक्षांना प्रत्येकी एक जागा निवडून आणता येणार आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. 'संभाजीराजे यांनी समर्थकांशी चर्चा करावी आणि आपला निर्णय कळवावा. यासाठी दोन दिवस वाट पाहू,' असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितल्याचे समजते. दुसरीकडे शिवसेनेसोबत असलेल्या आठ अपक्ष आमदारांनी बाहेरच्यांना उमेदवारी देण्याऐवजी शिवसेनेतीलच एखाद्या नेत्याला संधी मिळावी, अशी भूमिका मांडल्याचे समजते. शिवसेनेला पाठिंबा देऊ : पवार पुणे : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा असेल. शिवसेनेने सहावा उमेदवार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांना किंवा अन्य कोणालाही उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीची सर्व मते त्या उमेदवाराला असतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सहाव्या जागेसाठी शिवसेना संभाजीराजे यांना उमेदवारी देणार का, याबाबत राजकीय वर्तुळात विविध कयास बांधले जात आहेत. राष्ट्रवादी संभाजीराजे यांना सहाव्या जागेसाठी पाठिंबा देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला असता, सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा असेल, असे पवार यांनी स्पष्ट केले. 'दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली म्हणून शिवसेनेच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीला मी स्वत: आणि फौजिया खान यांच्या रूपाने राज्यसभेच्या दोन जागा मिळाल्या. सध्याच्या मतांच्या कोट्यानुसार राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा एक-एक उमेदवार सहज जिंकू शकतो,' असे पवार म्हणाले.