काँग्रेस आमदारांना हॉटेलात ठेवणार?; लाइव्ह लोकेशन पाठवण्याचे आदेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 22, 2022

काँग्रेस आमदारांना हॉटेलात ठेवणार?; लाइव्ह लोकेशन पाठवण्याचे आदेश

https://ift.tt/Z10GAT8
- सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश - दिवसभर बैठकांच्या मालिका - आमदार 'नॉट रिचेबल' असल्याचे वृत्त पक्षाने फेटाळले म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना नेते यांच्या नाराजीनाट्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसही 'अॅक्शन मोड'वर आली असून, काँग्रेसमधील सर्व आमदारांना तातडीने मुंबई गाठण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. या सर्व आमदारांना एकाच हॉटेलात ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर पक्षाचे सर्व आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असून, काँग्रेसचे आमदार 'नॉट रिचेबल' असल्याचे वृत्त पक्षाकडून फेटाळून लावण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे यांच्या नाराजी नाट्यानंतर मंगळवारी दिवसभर पक्षातंर्गत बैठकींचा जोर वाढल्याचे चित्र दिवसभर दिसून आले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला कोणताही धोका नसल्याचा दावा प्रभारी एच. के. पाटील यांनी केला. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पराभवाचा धक्का महाराष्ट्र काँग्रेसला बसला असतानाच मंगळवारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्याने महाराष्ट्र काँग्रेसची झोप उडविली. मंगळवारी सकाळीच काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या रॉयल स्टोन या निवासस्थानी पक्षश्रेष्ठी आणि आमदारांची बैठक बोलविली. या बैठकीसाठी सोमवारी रात्रीपासून निरोप पाठविले जात होते. मात्र, काही आमदारांचे नंबर नॉट रिचेबल आल्याने काँग्रेस नेत्यांचे टेंशन वाढले होते. विधान परिषद निवडणुकीनंतत अनेक आमदार मतदारसंघात परतले होते. त्यामुळे संध्याकाळी पुन्हा एकदा काँग्रेसतर्फे बैठकीचे फर्मान आमदारांना पाठविण्यात आले. त्यानंतर काँग्रेस नेत्यांची धावपळ सुरू झाली. निकालानंतर नागपूरला रवाना झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही तातडीने मुंबई गाठली. तर महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील हेसुध्दा संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहचले. तत्पूर्वी काँग्रेसची महत्त्वाची बैठक बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी पार पडली होती. मात्र, दुपारी तीनच्या सुमारास काँग्रेसमधील पाच आमदार 'नॉट रिचेबल' असल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. या वृत्ताने पक्षातील नेतेमंडळींची झोप उडविली. काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात आहेत. काही आमदार 'नॅाट रिचेबल' असल्याच्या बातम्या चुकीच्या, दिशाभूल करणाऱ्या व असत्य असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसकडून सर्व आमदारांना तातडीने मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले. या सर्व आमदारांना लवकरच एका सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येणार असून, त्याची चाचपणी पक्षाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर संध्याकाळी पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या आमदारांची आणि पक्षश्रेष्ठींची एक बैठक पार पडल्याची माहिती समोर आली. लाइव्ह लोकेशन पाठवण्याचे आदेश कोणत्याही आमदारांनी दगाफटका करू नये, म्हणून पक्षाने व्हॉट्सॅपवरून त्यांचे लाइव्ह लोकेशन पक्षाच्या नेत्यांना पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातच काही आमदारांना हे कसे पाठवतात हे माहिती नसल्याने त्यांना पक्ष कार्यालयातून लाइव्ह लोकेशन कसे पाठवतात, हे फोनवरच सांगून त्यांच्याकडून ते मागवून घेतले गेले.