एकनाथ शिंदेंनी सूरतमध्ये फडकावला बंडाचा झेंडा; शिवसेनेभोवती चक्रव्यूह, शिंदे यांच्यापुढे 'हे' आहेत पर्याय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 22, 2022

एकनाथ शिंदेंनी सूरतमध्ये फडकावला बंडाचा झेंडा; शिवसेनेभोवती चक्रव्यूह, शिंदे यांच्यापुढे 'हे' आहेत पर्याय

https://ift.tt/Pi6SfjZ
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याचा अवधी मिळण्याआधीच शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री यांनी नवी चाल खेळून सोमवारी मध्यरात्री गुजरातमधील सुरतेची वाट धरली. शिंदे यांनी समर्थक आमदारांना सोबत घेऊन केलेल्या बंडामुळे शिवसेना पुरती चक्रव्यूहात अडकली असून, आघाडी सरकारला खिंडार पडले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात पक्षाची धुरा उद्धव ठाकरे यांच्या हाती असताना शिवसेनेत झालेले हे पहिले बंड आहे. त्यामुळे एकीकडे शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करतानाच दुसरीकडे त्यांच्या मनधरणीचेही शिवसेनेतून प्रयत्न सुरू आहेत. शिंदे यांनी बंड करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिले असून, त्यांच्या बंडाच्या शिडात हवा भरण्याचे काम भाजप करीत असेल, तर राज्यात नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून डावलले जात असल्याच्या भावनेतून शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. त्यांच्याकडील नगरविकास खात्यात होत असलेल्या हस्तक्षेपामुळे नाराजीत भर पडली होती. मुंबई महापलिका, एमएमारडीए यासारख्या महत्त्वाच्या संस्थांमधील निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात होते. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत शिंदे यांना अंधारात ठेवले जात होते. त्यातूनच शिंदे यांनी बंडाचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. शिवाय आमदारांना मुख्यमंत्र्यांची भेट न मिळणे, आमदारांची मतदारसंघातील कामे न होणे, निधी न मिळणे, शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही सरकारवर राष्ट्रवादीचा वरचष्मा असणे यामुळे शिवसेनेतील आमदार नाराज होते. या नाराज आमदारांचे नेतृत्व करून शिंदे यांनी बंड पुकारले. सोमवारी विधानभवनात विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी मुंबईतून काढता पाय घेऊन थेट सुरत गाठले. शिंदे यांच्या गोटात सुरू असलेल्या हालचालींची कल्पना खुद्द उद्धव ठाकरे यांनाही नव्हती. त्यांना याची माहिती मिळताच शिंदे यांचा ठावठिकाणा शोधण्याचे आदेश दिले. शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार 'नॉट रिचेबल' असल्याने सोमवारी रात्री उशिरा शोधाशोध सुरू होती. अखेर शिंदे त्यांच्या समर्थकांसह सुरतमध्ये असल्याचे समजले. त्यानंतर मंगळवारी सकाळी कोण कोण आमदार सोबत आहेत, त्याची माहिती घेऊन इतर सर्व आमदारांना मुंबईमध्ये तातडीने बोलावण्यात आले. शिंदे यांनी आणखी पुढे जाऊन काही अन्य निर्णय घेण्यापूर्वी शिवसेनेने त्यांना पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदावरून दूर केले. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर तातडीने शिवसेना आमदारांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे विधानसभेतील १६ आमदार उपस्थित होते. शिंदे यांना गटनेते पदावरून हटवून त्यांच्या जागी शिवडीतील आमदार अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. तसा प्रस्ताव विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना देण्यात आला. नार्वेकर, फाटक सूरतमध्ये दाखल शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी ठाकरे यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी सकाळी वर्षावर महत्त्वाचे शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक यांना सूरतला पाठविले. शिंदे सूरतला ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तेथे सुरुवातीला नार्वेकर, फाटक यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर शिंदे यांनी या दोघांशी बंद दरवाजाआड चर्चा केली. या वेळी नार्वेकर आणि फाटक यांनी ठाकरे यांचा निरोप शिंदे यांना दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे यांची फोनवरून जवळपास २० मिनिटे चर्चाही झाली. एकनाथ शिंदे यांच्यापुढील पर्याय - समर्थक आमदारांसोबत स्वतंत्र गटाची स्थापना करणे. - स्वतंत्र पक्ष निर्माण करून भाजपला बाहेरून पाठिंबा देत सत्ता स्थापनेचा प्रयत्न - दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाने अथवा प्रेरणेने स्वतंत्र पक्ष निर्माण करणे - एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत समन्वय साधून पुन्हा एकदा शिवसेनेत सक्रिय होणे शिंदे यांचे सूचक ट्वीट शिंदे यांनी जवळपास १२ तासांच्या नाट्यानंतर एक सूचक ट्वीट केले. 'आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याशी आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,' असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.