रोहित, कोहलीसह स्टार खेळाडू आले जमिनीवर, भरत ठरला भारतासाठी तारणहार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 24, 2022

रोहित, कोहलीसह स्टार खेळाडू आले जमिनीवर, भरत ठरला भारतासाठी तारणहार

https://ift.tt/4lb2AmT
लंडन : इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला सराव सामन्यातच लोटांगण घालण्याची वेळ आली आहे. या सराव सामन्यात भारताचे रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे स्टार खेळाडू धारातीर्थी पडल्याचे पाहायला मिळाले. भारत आणि लिसेस्टरशायर यांच्यात आज चार दिवसीय सामन्याला सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी भारतावर आठ विकेट्स गमावण्याची वेळ आली. पण यावेळी भारताचा युवा यष्टीरक्षक श्रीकर भरत हा संघासाठी धावून आल्याचे पाहायला मिळाले. कारण भरतने यावेळी अर्धशतक झळकावल्यामुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश आले. सराव सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली, पण त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. कारण भारतीय संघाला ५० धावांमध्ये आपले दोन्ही सलामीवीर गमवावे लागले. रोहित शर्माला यावेळी २५ धावा करता आल्या, तर शुभमन गिल हा २१ धावांवर बाद झाला. त्यानंतरही भारताची पडझड थांबली नाही. कारण त्यानंतर पाच धावांमध्ये भारताचे अजून दोन फलंदाज बाद झाले. श्रेयस अय्यरला यावेळी भोपळाही फोडता आला नाही तर हनुमा विहारी यावेळी तीन धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजाही यावेळी १३ धावांवर बाद झाला आणि भारताची ५ बादद ८१ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी विराट कोहली आणि भरत हे दोघेही खेळपट्टीवर होते. कोहली यावेळी दमदार खेळी साकारेल, असे वाटत होते. पण यावेळी त्याला ३३ धावांवर समाधान मानावे लागले. पण भरत मात्र यावेळी खेळपट्टीवर ठाण मांडून उभा राहीला. भरतने यावेळी आपले अर्धशतकही पूर्ण केले. भारताकडून अर्धशतक झळकावणारा या डावातील तो एकमेव फलंदाज ठरला. भरतने यावेळी आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ७० धावांची झुंजार खेळी साकारली. भरतच्या या खेळीमुळेच भारताला पहिल्या दिवसअखेर ८ बाद २४६ अशी मजल मारता आली. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भरत शतक साजरे करतो का, याकडे भारताच्या चाहत्यांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे उद्याचा दिवस भरतबरोबरच संघासाठी महत्वाचा असेल.