अभिमानास्पद: ऑलम्पिकचं मैदान गाजवल्यानंतर, मूकबधिर वैष्णवी दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 18, 2022

अभिमानास्पद: ऑलम्पिकचं मैदान गाजवल्यानंतर, मूकबधिर वैष्णवी दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण

https://ift.tt/v8NPEyw
धुळे : ब्राझील येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या धुळे शहरातील मूळची रहिवासी असणाऱ्या वैष्णवी मोरे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत देखील घवघवीत यश संपादन केले असून ७९ टक्के गुण मिळवत तिने यशाला पुन्हा एकदा गवसणी घातली आहे. जन्मजात मूकबधिर असणाऱ्या वैष्णवीने क्रीडाक्षेत्रात सोबत अभ्यासात देखील उत्तुंग भरारी घेतल्याने तिचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. मूळची धुळे शहरातील रहिवासी असणारी आणि महाराणा प्रताप विद्यालयात शिक्षण घेतलेल्या वैष्णवीचे वडील मासे विक्रीचा व्यवसाय करतात तर आई गृहिणी असून अत्यंत गरीब परिस्थितीत तिचे कुटूंबीय आपला उदरनिर्वाह करीत आहे. जन्मजात मूकबधिर असणाऱ्या वैष्णवीचे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण प्राध्यापक रघुनाथ केले वाकश्रवण विद्यालयात झाले आहे. त्यानंतर शहरातील महाराणा प्रताप विद्यालयात तिचे पुढील शिक्षण सुरू असून वैष्णवी कुस्ती आणि जुडो कराटे क्षेत्रातदेखील जिल्ह्यात चांगलीच नावाजलेली मल्ल म्हणून तिची ओळख आहे. वैष्णवीचे वडील बाला मोरे यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. धुळे शहरातील देवपुरातील बापूजी भंडारी गल्लीत राहणाऱ्या वैष्णवीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ७९ टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. नुकतीच ब्राझील येथे झालेल्या डेफ ऑलिम्पिक स्पर्धेत देखील महाराष्ट्रातून दोन मुलींची निवड झाली होती. यात वैष्णवीचा देखील समावेश होता ब्राझीलची ऑलम्पिक स्पर्धा गाजवणाऱ्या वैष्णवीने दहावीच्या परीक्षेत देखील घवघवीत यश संपादन केल्याने तिचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.