राज्यसभेपेक्षा अधिक चुरशीची होणार विधान परिषद निवडणूक, भाजपची मोठी खेळी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 9, 2022

राज्यसभेपेक्षा अधिक चुरशीची होणार विधान परिषद निवडणूक, भाजपची मोठी खेळी

https://ift.tt/5lhOLaQ
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी बुधवारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार घोषित केले. एक जागा निवडून येण्यासाठी २७ मतांचा कोटा आवश्यक असताना भाजपने पाचवा उमेदवार दिल्याने विधान परिषदेचीही निवडणूक होणार असून ती राज्यसभेपेक्षा अधिक चुरशीची होणार आहे. मात्र भाजपच्या पाचव्या उमेदवारासाठी म्हणजे यादीनुसार प्रसाद लाड यांच्यासाठी भाजपला जवळपास सगळ्या म्हणजे २७ मतांची बेगमी करावी लागणार आहे. भाजपने बुधवारी श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड अशी उमेदवारांची यादी जाहीर केली. भारतीय हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत मर्जीतील समजले जातात. फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे त्यांचे ओएसडी म्हणून कार्यरत होते. संघाची पार्श्वभूमी असलेले भारतीय हे नाव फडणवीस यांच्या विनंतीवरूनच केंद्रीय नेत्यांनी नक्की केल्याचे समजते. राम शिंदे हे धनगर समजातील असून कर्जत-जामखेडमध्ये पवार घराण्यातील रोहित पवार यांच्या बाजूने लागलेल्या निकालाचे पुढच्या निवडणुकीत उट्टे काढण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून त्यांना तिकीट देण्यात आले आहे. खापरे या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. मात्र महिला म्हणून पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत होते. अर्थात भाजपमधील अंतर्गत राजकारण पाहता मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असलेल्या कुठल्याही नावाचे भवितव्य गेल्या पाच-सात वर्षांत फार चांगले दिसलेले नाही. त्यामुळे मुंडे समर्थक कितीही नाराज झाले तरी पंकजा यांना उमेदवारी मिळणे कठीण आहे, अशीच चर्चा भाजपमध्ये होती. दरेकर हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. तसेच ते फडणवीस यांच्या मर्जीतील असल्यामुळे त्यांची उमेदवारी नक्की होती. मात्र लाड हे भाजपमध्ये गेल्यापासून कायम फडणवीस यांच्या मागेपुढे फिरताना दिसत असूनही त्यांना पाचव्या क्रमांकाची उमेदवारी दिल्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे. राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने भाई जगताप व चंद्रकांत हांडोरे यांची नावे बुधवारी जाहीर केली. हांडोरे यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने दलित समाजात सकारात्मक संदेश जाऊन मुंबई महानगरपालिकेत किमान काही मतांचा फायदा पक्षाला होऊ शकतो, असे गणित हायकमांडला समजावण्यात आल्याचे समजते. जगताप यांना तिसऱ्यांदा विधान परिषदेची उमेदवारी मिळत आहे. २७ मतांच्या कोट्याचा विचार करता काँग्रेसचा पहिला उमेदवार म्हणजे चंद्रकांत हांडोरे हे अगदी सहज निवडून येतील. मात्र भाई जगताप यांना किमान १० ते १२ मतांची बेगमी करावी लागणार आहे. याचाच अर्थ विधान परिषदेतील चुरस ही जगताप विरुद्ध लाड अशीच होणार आहे. यापूर्वीही मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या जागेवर या दोघांमध्ये अशीच लढत पाहायला मिळाली होती. तेव्हा लाड हे अपक्ष लढले होते. त्यांना राष्ट्रवादीतील एका गटाचा आतून पाठिंबा होता. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीत लक्ष घालून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना तंबी दिल्याने लाड यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतरच लाड यांनी तत्काळ भाजपची वाट धरली होती. या निवडणुकीत जर लाड यांचा पराभव झाला तर तो एका अर्थाने फडणवीस यांच्या जिव्हारी लागणाराच असेल. पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिग्गज नेते लाड यांच्याबाबत प्रचंड नाराज असल्याचे बोलले जाते. मात्र राष्ट्रवादीतील अनेक मंत्र्यांचे लाडके असलेल्या लाड यांना बळ मिळते की नाही, हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. शिवसेनेने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना यावेळी तिकीट न दिल्याने त्यांचे मंत्रिपदही जाणार, हे नक्की आहे. देसाई, दिवाकर रावते व रामदास कदम या दिग्गज नेत्यांनी यापुढे पक्षाचे सल्लागार म्हणून काम करावे, अशी सेना नेतृत्वाची इच्छा होती. त्याप्रमाणे कदम व रावते यांच्याबाबत निर्णय झाला होता. मात्र देसाई यांना मंत्रिपद दिल्याने कदम यांची नाराजी मागील काही दिवसांत उघड झाली होती. आता मात्र देसाई हे पक्ष कार्यातच स्वतःला गुंतवून घेणार, हे स्पष्ट आहे. शिवसेनेच्या दोन जागा अगदी सहज येणार आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या सचिन अहिर यांना उमेदवारी देऊन शिवसेनेत भविष्यातील वारे कोणत्या दिशेने वाहणार, हे यातून नक्की झालेले आहे. के. सी. पाडवी यांच्या विरोधात विधानसभा लढणाऱ्या आमशा पाडवी यांना विधान परिषद देऊन सेनेने संजय पवार यांच्याप्रमाणेच सामान्य शिवसैनिकांचा आम्हाला अद्याप विसर पडलेला नसल्याचाही इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांची नावे नक्की झाल्याचे सूत्रांचे म्हणणे असले तरी रात्री उशिरापर्यंत त्यांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. राष्ट्रवादीतील नव्या नेतृत्वाचा निंबाळकर यांच्या नावाला आक्षेप होता. तर पवार यांनी निंबाळकर यांचे नाव नक्की केले होते. या तिढ्यामुळे बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्यांची नावे जाहीर झाली नव्हती. पक्ष आणि उमेदवारांची नावे भाजप : श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड शिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी काँग्रेस : चंद्रकांत हांडोरे, भाई जगताप विधानसभेतील पक्षीय बलाबल (विधान परिषदेत एका जागेसाठी २७ मतांची गरज) काँग्रेस ४४, राष्ट्रवादी ५३, शिवसेना ५५, भाजप १०६, छोटे पक्ष १६ (बविआ ३, सपा २, एमआयएम २, प्रहार २, मनसे १, माकप १, स्वाभिमानी १, आरएसपी १, जनसुराज्य १, शेकाप १, क्रांतीकारी शेतकरी पक्ष १), अपक्ष १३, असे २८७ सदस्य विधानसभेत आहेत. शिवसेनेच्या रमेश लटके यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे.