
मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश यांनी आज दिले. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू (बु) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आ. अशोक पवार तथा प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. "छत्रपती संभाजी महाराज आपल्या हृदयात आहेतच. त्यांचे स्मारक देखील मनाचा ठाव घेणारे आकर्षक आणि भव्य असावे. संभाजी महाराजांचे आयुष्य संघर्षमय असे होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ उतार होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वांच्या घटनांचे प्रतिबिंब हे स्मारक पाहणाऱ्यांच्या मनात उमटावेत इतके भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असे स्मारक असले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना सादर केल्या जाव्यात. त्या त्रिमितीय स्वरुपात सादर करण्यात याव्यात", असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "तरुणांमध्ये ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले, स्मारक याबाबत मोठे आकर्षण आहे. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता गर्दी होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून सर्वसमावेशक आकर्षक स्मारक झाले पाहिजे तसा आराखडा पुन्हा शिखर समितीसमोर सादर करावा". महसूल मंत्री थोरात म्हणाले, "देश-विदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पर्यटकांना देशात आल्यानंतर किंवा राज्यातील पर्यटकांना सुद्धा हमखास या स्मारकास भेट द्यावी असे वाटावे इतके सुंदर, माहितीपूर्ण आणि आपल्या इतिहासाची साक्ष देणारे हे स्मारक असावे तसा आराखडा तयार करून नियोजन करावे".