'काळ मोठा कठीण आलाय, पण ही वेळही निघून जाईल'; 'सामना'तून शिवसैनिकांना संदेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 4, 2022

'काळ मोठा कठीण आलाय, पण ही वेळही निघून जाईल'; 'सामना'तून शिवसैनिकांना संदेश

https://ift.tt/fSd1QWX
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पक्षातील ३९ आमदार फुटले असतानाच आता बंडखोर गटाकडून संपूर्ण शिवसेनेवरच दावा करण्यात आला आहे. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे () त्याकडे डोळे लावून बसली होती. मात्र, विधिमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते असल्याची मान्यता दिल्यामुळे पक्षाच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता खरोखरच उद्धव ठाकरे () यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या अस्तित्त्वाविषयी शंका उपस्थित झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून राज्यभरातील शिवसैनिकांना एक संदेश देण्यात आला आहे. काळ मोठा कठीण आला आहे हे खरे, पण हा काळाकुट्ट काळही निघून जाईल, असे 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे. या अग्रलेखातून एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर आसूड ओढण्यात आले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरही टीका करण्यात आली आहे. घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच दुटप्पी वागत असतील तर अपात्र विधानसभा सदस्यच काय, बाहेरचे सोमेगोमे आत आणून विधिमंडळात कोणतेही ठराव व निवडणूक हे लोक जिंकू शकतात. महाराष्ट्रात असे वर्तन व राजकारण कधीच घडले नव्हते. शिवरायांच्या साक्षीने बाळासाहेब ठाकरे यांच्या शपथा घेऊन हे पाप कोणी करत असेल तर भारतमाता त्यांना माफ करणार नाही. गेल्या अडीच वर्षांपासून राज्यपालांच्या टेबलावर प्रलंबित असलेल्या १२ नामनियुक्त आमदारांची फाईल आता लगेच मंजूर होईल. पेढे भरवण्याचा कार्यक्रम पुन:पुन्हा होत राहील, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 'बंडखोर आमदारांचे चेहरे पडले होते, मनातील पाप त्यांना खात होते' उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई असा मोठा प्रवास करून शिंदे गटाचे आमदार मुंबई विमानतळावर उतरले तेव्हा विमानतळापासून कुलाब्यातील त्यांच्या हॉटेलपर्यंत सुरक्षेसाठी हजारो केंद्रीय जवान दुतर्फा बंदुका घेऊन उभे होते. फक्त हवाई दल व सैन्यच वापरायचे काय ते बाकी होते. कसाबच्या सुरक्षेसाठीही इतके पोलीस नव्हते, पण महाराष्ट्र हा शहीद स्वाभिमानी तुकाराम ओबळेचा आहे, हे शिंदे गटाच्या आमदारांनी विसरू नये. आमदार आले, भगवे फेटे घालून बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळय़ास अभिवादन करून निष्ठेचे नाटक केले, पण या सगळ्यांचे चेहरे साफ पडलेले दिसत होते. त्यांचे पाप त्यांचे मन कुरतडत आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक चैतन्य व ऊर्जेचा सूर्य आहे, हे भगवे फेटेधारी आमदार काजवेही नव्हते. शिवसेनेत असताना काय ते तेज, काय तो रुबाब, काय ती हिंमत, काय तो सन्मान, काय तो स्वाभिमान... असे बरेच काही होते. "कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला" असे गर्जले जात होते. तसे काही चित्र आता दिसले नाही. कानटोप्या घालाव्यात तसे भगवे फेटे घालून 'मावळे' होता येईल काय?, अशी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे.