शिवसेना आमदारांची एकच धावपळ, विधिमंडळातील पक्ष कार्यालय सील - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 4, 2022

शिवसेना आमदारांची एकच धावपळ, विधिमंडळातील पक्ष कार्यालय सील

https://ift.tt/VZFWb5S
‌म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई ः राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचे पडसाद विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातही दिसून आले. शिवसेनेच्या दोन गटांत सध्या एकमेकांकडून दावा प्रतिदावा सुरू असतानाच विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय सील करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना आमदारांची एकच धावपळ सुरू झाल्याचे चित्र विधानभवनात पाहायला मिळाले. अखेर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या कार्यालयात बैठक घेण्याची वेळ शिवसेना आमदारांवर आली. या आमदारांना गोऱ्हे यांच्या कार्यालयाचा आधार मिळाल्याने विधिमंडळात नव्या चर्चेला सुरुवात झाली. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस अनेक घडामोडींचा ठरला. शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाने दिलेल्या आदेशामुळे शिवसेना पक्ष कार्यालय सील करण्यात आल्याने शिवसेनेला एकच धक्का बसला. त्यामुळे शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयातील कर्मचारी रविवारी सकाळपासून कार्यालयाबाहेरच बसून राहावे लागले. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वादामुळे हे कार्यालयच सील करण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या आदेशाने कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची सूचना लिहिण्यात आली आहे. मात्र, ही सूचना कोणी दिली, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शिंदे गटाने ही कुरघोडी की शिवसेनेने शिंदेसमर्थकांना रोखण्यासाठी ही सूचना केली याबाबत चर्चा सुरू आहेत. या सर्व प्रकारामुळे शिवसेना आमदारांना मात्र त्याचा फटका बसला. आमदारांच्या बैठकीसाठी तातडीने जागेची शोधाशोध सुरू झाली. अखेर सर्व आमदारांनी आपला मोर्चा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयाकडे वळवला. शिवसेनेचे विधानसभा अध्यक्ष निवडीचे उमेदवार राजन साळवी आणि इतरांनी अखेर या कार्यालयातच आपली बैठक आयोजित केली. या बैठकीनंतर सर्व आमदार विधानसभेत दाखल झाले. दरम्यान, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही हे आमदार याच कार्यालयात येतील, असा अंदाज वर्तविला जात असून, हे कार्यालय सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.