झिका व्हायरसने वाढवली डोकेदुखी, पालघरमध्ये ७ वर्षीय मुलीला लागण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 14, 2022

झिका व्हायरसने वाढवली डोकेदुखी, पालघरमध्ये ७ वर्षीय मुलीला लागण

https://ift.tt/Lbt08Tz
पालघर : जिल्ह्यातील तलासरी येथील झाई आश्रम शाळेतील सात वर्षीय मुलीला झिका विषाणूची लागण झाली आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेच्या अहवालात हे स्पष्ट झालं आहे. जुलै २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यात राज्यातील पहिला झिका रुग्ण आढळला होता. या अनुषंगाने पालघर येथे सर्वेक्षण, कीटक व्यवस्थापन उपचार आणि आरोग्य शिक्षण अशा प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याचं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. झिकाचा हा राज्यातील दुसरा रुग्ण आहे. झाई आश्रमशाळेमध्ये शनिवारी दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. यानंतर या शाळेतील विद्यार्थिनीची तपासणी केली असता १५ विद्यार्थिनींना अंगदुखी, डोकेदुखी, ताप ही लक्षणे आढळून आली. त्यामुळे या विद्यार्थिनींना शनिवारी सायंकाळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या विद्यार्थिनींचे नमुने एनआयव्हीला तपासणीसाठी पाठविले. यामध्ये एका मुलीला झिकाची लागण झाल्याचं आढळलं आहे, तर अन्य सहा विद्यार्थिनींना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून सात दिवस त्यांना देखरेखीसाठी रुग्णालयात ठेवले जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय बोदाडे यांनी दिली. दरम्यान, जुलै २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यात राज्यातील पहिला झिका रुग्ण आढळला होता.