
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : ज्यांच्या जीवावर शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आला, त्यांनाच फाट्यावर बसवून बंडखोरी करण्याचा तुमचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्याच आहे, अशी जोरदार टीका शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी कोल्हापुरात केली. शिवसेनेचे खासदार व यांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिकांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या विरोधात सुनील मोदी यांनी रेल्वे बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे. दोन्ही खासदारांचा शिवसैनिकांनी निषेध केला आहे. मोदी यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीत म्हणाले, "संजय मंडलिक आणि माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांना शिवसेनेबरोबरच इतर पक्षातील काही लोकांनीही मदत केली. पण सेना सोडून जाताना या दोघांनी केवळ आपल्या गटातील लोकांशी चर्चा केली. ज्यांनी निवडणुकीत त्यांना मदत केली, त्यांना दोन्ही खासदारांनी कात्रजचा घाट दाखवला. त्यामुळे ही बाब अतिशय निषेधार्य आहे. त्यांना मदत करणाऱ्या सर्व घटकांना एकत्रित करून चर्चा केली असती तर हा त्यांचा प्रामाणिकपणा पुढे आला असता, पण तसे त्यांनी केले नाही, यावरूनच त्यांच्या बंडखोरीत काहीतरी काळेबेरे आहे हे स्पष्ट होते. केवळ निधीचे कारण पुढे करत त्यांनी बंडखोरी केली आहे, पण हे कारण होऊ शकत नाही". 'सोने तर सोडाच पण हे बेन्टेक्स पेक्षाही वाईट निघाले' मोदी म्हणाले, कोल्हापुरातील शिवसेनेचा इतर कोणताही पदाधिकारी शिंदे गटात जाऊ नये यासाठी आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. जे गेले ते स्वतःला सोने समजत होते पण ते तर बेन्टेक्स पेक्षाही वाईट आहेत, असा टोला शहर संघटक हर्षल सुर्वे यांनी मारला. मंडलिक यांना आम्ही उसने घेतले होते ते आता पुन्हा परत गेलेत. येत्या काळात शिवसेना त्यांच्या विरोधात निवडणूक लढवेल आणि जिंकूनही दाखवेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी अवधूत साळोखे कमलाकर भोसले, रवी चौगुले उपस्थित होते.