
नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं कारवाई करत अटक केली आहे. पत्रा चाळ प्रकरणात ईडीनं संजय राऊत यांना अटक केली. आज विशेष पीएमएलए कोर्टात त्यांना हजर केल्यानंतर ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी संजय राऊत यांच्या बाजूनं उभे राहिले आहेत. राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि मोदींवर यावरुन टीका केली आहे. राजाचा संदेश स्पष्ट आहे, जो माझ्या विरोधात बोलेल त्याला त्रास सहन करावा लागेल. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करुन विरोधकांचं धैर्य तोडणं आणि सत्याचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, हुकूमशाहनं हे लक्षात घ्यावं शेवटी सत्याचा विजय होईल आणि अहंकार पराभूत होईल, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांचं ट्विट संजय राऊत यांच्या अटकेवरुन राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. विरोधकांची ताकद मोडून काढणे आणि सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र सत्याचा विजय होईल, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. विरोधकांचा आवाज दाबू नये काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी संजय राऊत यांच्या अटकेवरुन केंद्रावर निशाणा साधला आहे. ईडीचा दुरुपयोग केला जात आहे. सरकारी सस्थांच्या कामाचा वापर राजकीय लाभासाठी केला जाऊ नये. आपल्या देशात लोकशाहीला महत्त्व आहे. लोकशाही महत्त्वाची असून तिचं संरक्षण करण आवश्यक आहे. विरोधकांचा आवाज दाबला जाऊ नये, असं शशी थरुर यांनी म्हटलं. भाजपची पोलखोल करणाऱ्यांवर कारवाई शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारकडून राजकीय कट कारस्थान करुन संजय राऊत यांना अटक केल्याचा आरोप केला. हा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचं त्या म्हणाल्या. देशात ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभागाचा गैरवापर करण्यात येत आहे. भाजप आणि केंद्र सरकारची पोलखोल करमाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, आम्ही तुमच्या विरोधात झुकणार नाही, असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केंद्र सरकारला आवाज दाबायचा आहे. संपत्तीचं कोणतं प्रकरण असेल तर त्याच्यासाठी कायदे आहेत. नियमांनुसार कारवाई केली पाहिजे. संजय राऊत यांच्या घरी जाऊन तासंतास चौकशी करणं हे शोषण आहे. देशात विरोधकांना संपवण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत, असं मल्लिकार्जून खर्गे म्हणाले.