
मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सरसंघचालक यांची त्यांच्या दादर येथील पितृछाया इमारतीतील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत हिंदुत्वाचा नात्याने जोडल्या गेलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या बैठकीत त्यांच्याबद्दलच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शिंदे यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीसाठी सरसंघचालकांनी शुभेच्छा दिल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन बाजूला सारुन एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांच्या पाठिंब्याने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपनेही आश्चर्यकारकरित्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसण्याचा मान दिला. राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार स्थापन होऊन जवळपास एक महिना झालं. पण अजूनही मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी जवळपास सहा दिल्लीवाऱ्या केल्या. पण या एक महिन्याच्या काळात त्यांनी सत्तास्थापनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महत्त्वाचा रोल असलेल्या सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतलेली नव्हती किंबहुना झालेली नव्हती. आज मुख्यमंत्र्यांची सरसंघचालकांशी बहुप्रतिक्षीत भेट झाली. या भेटीत हिंदुत्वाच्या समान धाग्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.... सरसंघचालक मोहन भागवत यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीसाठी मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो. एका कार्यक्रमातून आम्ही तिथे एकत्र आलो आणि आमची भेट झाली. मोहन भागवत आमच्यासाठी आदरणीय आहेत. नव्या सरकारसाठी त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेतले. त्यांची ही भूमिका बाळासाहेबांच्या विचाराचीच आहे, अशी प्रतिक्रिया भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले... फडणवीस म्हणाले, या भेटीचा हिंदुत्व हा समान धागा होता. तसेच सरसंघचालकांनी चांगले काम करा, असा आशीर्वाद आम्हाला दिला. एकमेकांना सोबत घेऊन राज्याचे राजकारण पुढे न्या, असंही सरसंघचालक म्हणाल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांना सरसंघचालकांची भेट घ्यायची होती. त्यामुळे ही भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली असल्याचं फडणवीस म्हणाले.