
चंद्रपूर : समुद्रपूर तालुक्याच्या मौजा पवनगाव येथे वाघाचा चौदा तुकड्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह गुरुवारी आढळला होता. या घटनेनंतर वन विभागाला वाघाची शिकार करून मारल्याचा अंदाज होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात वनविभागाला यश आले असून प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.आरोपीने चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील महालगाव (खुर्द) शेतशिवारात ताराच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करून वाघाची शिकार केली. त्यानंतर वाघाचा मृतदेह वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मौजा पवनगाव येथील झुडपी जंगलात नेत तेथे निर्दयतेचा कळस गाठत वाघाच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे पुढे आले आहे. अविनाश भारत सोयाम (३४) रा. महालगाव (खुर्द) ता. वरोरा जि. चंद्रपूर , असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (It has been revealed that the tiger was hunted by passing an electric current) समुद्रपूर तालुक्यातील कोरा नजीकच्या मौजा पवनगाव झुडपी जंगलात तब्बल चौदा तुकड्यांत वाघाचा कुजलेला मृतदेह गुरुवारी आढळला होता. हे अवैध शिकारीचे प्रकरण असल्याचा निष्कर्ष काढत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा सुगावा शोधला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील महालगाव गाठून संशयित आरोपी म्हणून अविनाश सोयाम याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली वनविभागाला दिली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपी अविनाश याला समुद्रपूर येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करून त्याची १७ ऑगस्टपर्यंत वनकोठडी मिळविली आहे.आरोपीने सोमवारी महालगाव वाघाची विद्युत प्रवाहीत करून वाघाची शिकार केली त्यानंतर मृतदेहची विल्हेवाट ही वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुकईल पवनगाव येथील झुडपी जंगलात लावली असल्याची माहिती आहे.वनकोठडी दरम्यान आरोपी आणखी काय माहिती देतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात आरोपी अविनाश याला आणखी काहींनी सहकार्य केल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात असून आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.