विनायक मेटेंच्या कारने धडक दिलेला ट्रक अन् चालक सापडला; दमणमधून पोलिसांची कारवाई - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 15, 2022

विनायक मेटेंच्या कारने धडक दिलेला ट्रक अन् चालक सापडला; दमणमधून पोलिसांची कारवाई

https://ift.tt/3vUAKVn
मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटेंचा आज पहाटे अपघाती मृत्यू झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झालेल्या मेटेंचा म़ृत्यू झाला. यांच्या अपघातास कारणीभूत असलेला ट्रक पालघरमधील असल्याची माहिती समोर आली आहे. मेटे यांच्या कारला धडक दिल्यानंतर ट्रकचा चालक ट्रक घेऊन फरार झाला होता. त्याला पालघर पोलिसांनी अटक केली आहे. विनायक मेटेंच्या फोर्ड एन्डेवेर कारला आयशर कंपनीच्या ट्रकनं धडक दिली. DN 09 P 9404 असा या ट्रकचा नंबर असून तो पालघरमधील कासा येथील एका व्यक्तीच्या मालकीचा आहे. विनायक मेटे यांच्या कारला अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक ट्रक घेऊन फरार झाला. उमेश यादव असं चालकाचं नाव आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्यानंतर उमेश यादव ट्रक घेऊन फरार झाला. पालघर आणि रायगड पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी वापी, दमण भागात रवाना झाले. यादव चालवत असलेल्या ट्रकचा अपघात झाल्याची आणि त्यानंतर यादव ट्रक घेऊन फरार झाल्याची माहिती ट्रकच्या मालकानं स्वत:हून पोलिसांना दिली होती. यानंतर पोलिसांनी मालकाला सोबत घेऊन यादवचा शोध सुरू केला. पालघर पोलिसांनी दमणमधून यादवला बेड्या ठोकल्या. अपघातग्रस्त ट्रकदेखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनामुळे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांसह बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. उद्या सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत शिवसंग्राम भवन या ठिकाणी मेटे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसंग्राम कार्यालयाकडून मिळाली आहे. दुपारी मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.