
जळगाव : जिल्ह्यात शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील नेतृत्वहीन झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने मंगळवारी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या नियुक्त्यांवरून आता जी शिवसेना उरलेली आहे, त्या शिवसेनेतही फूट पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मान्य नसल्याचा रोष व्यक्त करत वरणगाव शहरात शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुखांच्या घरासमोर रात्रीच्या वेळी तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. (Shiv Sainik will meet against the local leadership due to a dispute in Jalgaon ) शिवसेना पक्षप्रमुख यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, नव्याने जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमुळे भुसावळ तालुक्यातील जुने शिवसैनिक चांगलेच नाराज झाले असून जुन्या शिवसैनिकांनी थेट वरणगाव येथील जिल्हाप्रमुखांचे घर गाठून जिल्हाप्रमुखांच्या घरासमोर तब्बल दोन तास ठिय्या मांडत जिल्हाप्रमुखांचा शिवसैनिकांनी तीव्र निषेध केला आहे. शिवसैनिकांची अनेक आंदोलने जिल्ह्याने पाहिली असतील. मात्र आज भुसावळ तालुक्यातील शिवसैनिक हे थेट आपल्या जिल्हाप्रमुखांच्या विरोधात दंड थोपटून उतरल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षकगिरी चलेंगी, नही चमचेगिरी चलेगी नही, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. ज्यांनी पक्षासाठी पूर्ण आयुष्य घातले अशा लोकांना डावलून नवीन येणाऱ्या लोकांना संधी दिली जाते. आम्ही गेल्या ४० वर्षांपासून शिवसेना कार्यकर्ते आहोत. परंतु आमचा विचार केला जात नाही. नवीन येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते व पदे दिले जातात. असा अन्याय आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देत त्यांनी आंदोलन केले. ही कार्यकारणी रद्द करा व नवीन नियुक्त करा अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनानंतरही जिल्हाप्रमुख भेटलेच नाही ; शिवसैनिकांचा अखेर काढता पाय तब्बल दोन तास शिवसैनिक जिल्हाप्रमुखांच्या घराबाहेर ठाण मांडून होते. मात्र जिल्हाप्रमुख घराबाहेर आले नाहीत. तर शिवसैनिकही त्यांच्या घरात जाऊन त्यांची भेट घ्यायला तयार झाले नाहीत. अखेर दोन तासानंतर ठिय्या मांडलेल्या शिवसैनिकांनी काढता पाय घेतला. मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे शिवसैनिकांनी बोलताना सांगितले आहे. शिवसैनिकांकडून संघटनेच्या वरिष्ठांना वेठीस धरण्याचा काम: जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचा आरोप तर, भुसावळ तालुक्यातील शिवसैनिक हे संघटनेच्या वरिष्ठांना वेठीस धरण्याचे काम करत असून शिवसैनिकांनी केलेले कृत्य हे निषेधार्य असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी व्यक्त केले आहे.