
-डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन; वि. सा. संघाचे आयोजन म.टा. प्रतिनिधी, नागपूरः 'देशापुढे अनेक आव्हाने उभी असतात. एक पक्ष, एक नेता या सगळ्या आव्हानांवर मात करू शकत नाही किंवा परिवर्तन घडवून आणू शकत नाही. ज्यावेळी समाज देशासाठी जगायला, मरायला तयार होतो, त्याचवेळी परिवर्तन घडून येते', असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. विदर्भ साहित्य संघाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'संस्थांची शतकोत्तर आव्हाने' या व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प डॉ. भागवत यांनी मंगळवारी गुंफले. वि. सा. संघाच्या अमेय दालनात आयोजित या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर होते. व्यासपीठावर 'वार्ता ईशान्य भारताची' या पुस्तकाचे लेखक सुनील किटकरू उपस्थित होते. रा. स्व. संघाची शंभर वर्षे पूर्ण होत असताना संघाला काही गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. जबाबदारी घेणारा समर्थ हिंदू समाज निर्माण झाला पाहिजे, या विचारातून संघाची स्थापना झाली. कोणताही नेता समाजाची निर्मिती करीत नाही, तर समाज नेता तयार करीत असतो. सर्व प्रकारच्या उपेक्षा आणि विरोधातून संघ आता अनुकूलतेच्या स्थितीत आला आहे. एक प्रचंड मोठे संघटन उभे झाले आहे. अशा स्थितीत कालच्या विरोधकांनाही जोडून घेण्यावर भर देण्याची गरज आहे. प्रामाणिकपणा, देशभक्ती, शिस्त, स्व आणि राष्ट्राची स्पष्ट कल्पना आणि देशासाठी मरण्याची भावना, हे गुण असणारा समाज निर्माण करावयाचा आहे. अनुभवाच्या कसोटीवर संघाचे काम सिद्ध झाले आहे, असे डॉ. भागवत म्हणाले. 'डॉ. भागवत यांच्यासह व्यासपीठावर बसणे हा माझा सन्मान आहे', असे म्हैसाळकर म्हणाले. वार्ता ईशान्य भारताची या पुस्तकाचे लेखक सुनील किटकरू यांनी ईशान्य भारताची स्थिती, त्यात झालेले बदल, रा. स्व. संघाचे त्यातील योगदान, यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र डोळके यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. विवेक अलोणी यांनी केले. डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. ईशान्येच्या उपेक्षेतून आव्हाने निर्माण ईशान्य भारताचा उर्वरित भारताशी रामायण आणि महाभारतकालापासून संबंध आहे. मात्र, नंतरच्या काळात या संबंधांची आपण उपेक्षा केली आणि त्यातून त्या प्रदेशात समस्या निर्माण झाल्या. कोणतेही आव्हान आततायीपणे काम करून दूर होत नाही. त्यासाठी दीर्घदृष्टीने काम करावे लागते. असे काम संघाने ईशान्य भारतात ४० वर्षांपूर्वी सुरू केले आणि त्याचे परिणाम आता दिसून येत आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले. सरसंघचालकांनी मांडली आव्हाने - नियमितपणे आवश्यक ते बदल करण्याची प्रक्रिया संघात आहे. ती कायम राहावी -संघ जुना झाला, म्हातारा होऊ नये - ७५ वर्षांनंतर जबाबदारी किंवा पद न घेता काम करत राहण्याची पद्धत कायम राहावी - समाज स्वावलंबी व्हावा, त्याने सरकार, पक्ष कुणावर अवलंबून राहू नये - संघ लहान नाही, त्यामुळे मोठेपणातून येणाऱ्या जबाबदाऱ्याही पेलाव्या लागतील - क्लासकडून मासकडे जाताना सर्वव्यापी स्वभाव व्हावा -अनुकूलता संकट, लोकप्रियता वाईट - साधनसमृद्धीचा काळ आहे, सुविधा आपल्या मालक होऊ नयेत