
शांघाय: शेकडो ग्राहक खरेदी करत असताना आयकियाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक दुकानाचे दरवाजे बंद केले. करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला ग्राहक आयकियाच्या स्टोअरमध्ये आला होता. त्यामुळे करोनाचा संसर्ग टाळणाऱ्यासाठी आयकियाच्या कर्मचाऱ्यांनी स्टोअरमध्ये असलेल्या सर्वच ग्राहकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चीनमधील शांघाय इथे असलेल्या आयकियाच्या स्टोअरमध्ये एकच खळबळ उडाली. करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला एक ग्राहक आयकियाच्या स्टोअरमध्ये आला होता. त्यामुळे स्टोअरच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजे बंद करून घेतले. त्यामुळे शेकडो ग्राहक आत अडकले. बऱ्याचशा ग्राहकांनी स्टोअरबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. काही जण कर्मचाऱ्यांना ढकलून बाहेर जाण्यात यशस्वी ठरले. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. करोना रुग्णाच्या संपर्कात आलेली व्यक्ती स्टोअरमध्ये आल्यानं आयकियाचं स्टोअर बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचं शांघाय आरोग्य आयोगाचे उपसंचालक झाओ डॅनडॅन यांनी सांगितलं. स्टोअरमध्ये आलेल्या आणि आसपास फिरलेल्या लोकांनी दोन दिवस विलगीकरणात राहावं आणि त्यानंतर ५ दिवस आरोग्य विभागाच्या निगरणीखाली राहावं, असं ते म्हणाले. शांघायमध्ये दररोज करोनाचे जवळपास ४०० नवे रुग्ण आढळून येत आहेत.