अकोला : अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात एक मुलगा वेषांतर करुन शिरला. ही घटना मागील आठ दिवसापूर्वी घडली होती. परंतु, कृषी विद्यापीठ प्रशासनाने यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नसून या प्रकरणात चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या गंभीर घटनेबाबत अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन करून विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांकडून घटनेचा व प्रशासनाच्या चुप्पीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेत निष्काळजी होत असल्याचं या घटनेच्या माध्यामातून समोर आलं आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षे संदर्भात अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. संबधित प्रकार हा गंभीर असून तो लक्षात आणून देण्याकरिता विद्यार्थी परिषदने आज मंगळवारी विद्यापीठात आंदोलन केले. यावेळी कुलगुरूंनी निवेदन स्वीकारण्यात विलंब केल्याची तक्रारही अभाविपकडून करण्यात आली आहे. यामुळे आंदोलनकर्त्यांनी विद्यापीठांतील कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला. दोषींवर कारवाई कडक कारवाईची मागणी या प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. विद्यार्थिनी वसतिगृहाच्या रेक्टर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठाची सुरक्षा वाढविण्यात यावी, तसेच भविष्यात असा निष्काळजीपणा होणार नाही याची काळजी घेण्याचे निवदनात नमूद आहे. महानगर मंत्री विराज वानखडे, महानगर सहमंत्री जयकुमार आडे, महानगर महविद्यालय प्रमुख अभिजित पानबिहाडे, कार्यालय मंत्री आदित्य पवार, देवयानी गोडबोले, निखिल यादव इत्यादी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कृषी विद्यापीठात सुरक्षा व्यवस्थेकरिता मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो असे अभिमानाने सांगितले जाते तरी असले प्रकार जर घडत असेल तर ही फार निंदनीय बाब आहे. असा आरोपही विद्यार्थी संघटनेने केला आहे. विद्यापीठाची बाजू डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी यावर भूमिका मांडली आहे. नेमका आजच तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे, तो मी पाहिला आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ते द्वितीय वर्षाचे विद्यार्थी असल्याचं समोर आलं आहे. वसतिगृहात जाऊन माहिती घेऊन आलो आहे, विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या नियमाची माहिती नाही, असं दिसून येतं. विद्यापीठानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी समिती द्वारे पुढील कठोर कारवाई करण्यात येईल, असं सुरेंद्र काळबांडे यांनी सांगितलं आहे.