मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त कधी; आमदारांची यादी अमित शहांकडे, भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 5, 2022

मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त कधी; आमदारांची यादी अमित शहांकडे, भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र?

https://ift.tt/3S6V5T9
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्रांती घेण्याचा डॉक्टरांनी दिलेला सल्ला, भाजपमध्ये मंत्र्यांच्या यादीवरून असलेली असहमती आणि आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी या सर्व पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत शक्याशक्यतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने विस्ताराबाबतच्या चर्चेला अंतिम स्वरूप मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे; तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्ली गाठली. फडणवीस यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या नेत्यांना भेटण्याची शक्यता असून, विस्ताराबाबत काही निर्णय होणार असल्याचे कळते. या भेटीत भाजपच्या मंत्र्यांची यादी निश्चित झाली, तरच काही दिवसांत म्हणजे रविवारपर्यंत मंत्रीमंडळाचा विस्तार शक्य असल्याचा दावा केला जात आहे. एकनाथ शिंदे 'आझादी का अमृत महोत्सव' आणि नीती आयोगाच्या बैठकीच्या निमित्ताने येत्या शनिवारी आणि रविवारी दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे ते दिल्लीतून मुंबईत परतल्यावर अर्थात रविवारी संध्याकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. भाजपची यादी अमित शहांकडे? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात दोघांचेच मंत्रीमंडळ अस्तित्वात आहे. दोघांच्या मंत्रीमंडळावर चौफेर टीका होत असतानाही शिंदे गट आणि भाजपला मंत्रीमंडळ विस्तार मार्गी लावणे शक्य झालेले नाही. आज ३५ दिवस उलटूनही मंत्रीमंडळ विस्ताराची चिन्हे दिसत नसल्याने इच्छुकांची अडचण झाली आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांची यादी तयार असली, तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजपच्या मंत्र्यांची यादी अंतिम करणार असल्याने विस्ताराचे गाडे अद्याप अडल्याचे समजते. भाजपकडून धक्कातंत्र अपेक्षित भाजपने शिंदे गटासोबत सत्ता स्थापन करताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन सर्वांनाच मोठा धक्का दिला. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारातही भाजपकडून धक्कातंत्र अपेक्षित आहे. तसे झाले तर भाजपमधील अनेक इच्छुकांना पक्षाच्या आदेशानुसार मंत्रिपदाचा त्याग करावा लागेल. २०२४ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून मंत्र्यांची यादी निश्चित केली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे या मंत्रीमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार याबद्दल भाजपमधल्या बड्या बड्या नेत्यांनाही उत्सुकता आहे.