एनसीबीची मोठी कारवाई; मुंबईत पकडले दुर्मिळ काळे कोकेन, किंमत ऐकून हादराल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 30, 2022

एनसीबीची मोठी कारवाई; मुंबईत पकडले दुर्मिळ काळे कोकेन, किंमत ऐकून हादराल

https://ift.tt/lhfmS6N
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मुंबईत अतिशय दुर्मिळ असे काळे कोकेन जप्त करण्यात आले आहे. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही महत्त्वाची कारवाई केली. त्यात एकूण ३,२०० ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले. परदेशातून प्रामुख्याने दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतून अमली पदार्थ भारतात आणण्याच्या घटना मागील काही महिन्यांत वाढल्या आहेत. त्यामुळे तपास यंत्रणा गुप्त माहितीच्या आधारे करडी नजर ठेऊन आहेत. विमानतळावर अमली पदार्थ आणले जाणार असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. त्याआधारे सापळा रचून संशयित तस्करावर नजर ठेवण्यात आली. ती महिला प्रवासी होती. ही महिला आदिस अदाबा येथून येऊन गोव्याला जाण्यासाठी संबंधित काऊंटरकडे जात होती. त्याचवेळी तिला अडविण्यात आले व तपासणी करण्यात आली. त्यावेळी महिलेकडील बॅगेत संशयित पाकिटे आढळली. त्यांची तपासणी केली असता त्यात काळा पदार्थ आढळला. तज्ज्ञांनी निरखून पाहिले असता ते काळे कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ते पदार्थ तत्काळ जप्त करण्यात आले व महिलेला ताब्यात घेण्यात आले. महिलेच्या चौकशीत या तस्करीचा संबंध गोव्याशी असल्याची माहिती समोर आली. ही महिला मूळ दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया येथील आहे. ती ब्राझिलहून आदिस अदाबा येथे आली. तेथून मुंबईत येऊन पुढे गोव्याला जाणार होती. संबंधित अमली पदार्थ ती गोव्यातील नायजेरियन हस्तकाला देणार होती. तेथून ते इतरत्र वितरित होणार होते, अशी माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे त्या नायजेरियन दलालादेखील अटक करण्यात आली. दोन कोटींहून अधिक मूल्य सामान्य कोकेनचा भारतीय बाजारातील दर ७० डॉलर प्रति ग्रॅम आहे. भारतीय रुपयांत हा दर साधारण ५,७०० रुपये होतो. जप्त करण्यात आलेल्या ३,२०० ग्रॅमचे मूल्य १.८२ कोटी रुपये होते. परंतु काळे कोकेन दुर्मिळ असल्याने त्याहून महाग आहे. बाजारात त्याचे मूल्य सध्या दोन कोटी रुपयांहून अधिक असण्याची शक्यता आहे.