शिंदे फडणवीस सरकारचं एक चाक ट्रकचं दुसरं ट्रॅक्टरचं, अनिल गोटेंचा पालकमंत्रिपदावरुन हल्लाबोल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 26, 2022

शिंदे फडणवीस सरकारचं एक चाक ट्रकचं दुसरं ट्रॅक्टरचं, अनिल गोटेंचा पालकमंत्रिपदावरुन हल्लाबोल

https://ift.tt/THIRUhZ
धुळे: राज्य सरकारने काल जिल्ह्याचे पालकमंत्री घोषित केले यात काही मंत्र्याकडे तीन ते चार जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार यांनी शिंदे फडणवीस सरकारचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. एक टायर ट्रकचे आणि दुसरे ट्रॅक्टरचे अशी अवस्था शिंदे फडणवीस सरकारची झाली असल्याची टीका अनिल गोटे यांनी केली आहे. शिंदे फडणवीस सरकारने पालकमंत्री जाहीर केल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री गिरीश महाजन यांचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे. अत्यंत अवघड परिस्थितीतून हे सरकार बनविण्यात आले आहे. शिंदे गटातील ४० आमदारांना मंत्रीपद हवे आहे, मात्र सध्या त्यांच्याकडे फक्त २२ मंत्रिपदे शिल्लक आहेत. सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशी अवघड परिस्थिती शिंदे फडणवीस सरकारची झाली आहे. एक चाक ट्रकचे आणि दुसरे चाक ट्रॅक्टरचे अशी सरकारची अवस्था असून एकेकाळी देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री असताना ३४ जिल्हे होते, मात्र आता केवळ त्यांच्याकडे ६ जिल्हे देणं हा त्यांचा अपमान असून आपल्याला त्यांची किव येते, अशी उपहासात्मक टीका अनिल गोटे यांनी यावेळी केली. धुळे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री गिरीश महाजन यांना धुळे जिल्हा मागून घेतल्याचे समजते याचे मला फार दुःख झाले. त्यांचे मी आपल्या जिल्ह्यात स्वागत करतो, आता खरी मजा येईल. गिरीश महाजन हे धुळ्यात आल्यानंतर त्यांची धुळे शहरातील देवपूर परिसरातून मिरवणूक काढावी, अशी देखील टीका अनिल गोटे यांनी यावेळी केली. दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांना नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळू शकतं, अशा चर्चा सुरु होत्या मात्र त्यांना धुळे, नांदेड आणि लातूरचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर, देवेंद्र फडणवीसांना नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या अशा विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.