दोन भाषा न आल्यानं सुरक्षेचा प्रश्न? विमान प्रवासात महिलेवर अन्याय, मंत्र्यानं थेट कंपनीला सुनावलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 20, 2022

दोन भाषा न आल्यानं सुरक्षेचा प्रश्न? विमान प्रवासात महिलेवर अन्याय, मंत्र्यानं थेट कंपनीला सुनावलं

https://ift.tt/HaWUfKm
हैदराबाद : देशभरात स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, स्थानिक भाषा बोलणाऱ्या व्यक्तींना अजूनही अनेक ठिकाणी अपमानित व्हावं लागतं. इंडिगो या कंपनीच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिलेला केवळ इंग्रजी किंवा हिंदी येत नसल्यानं तिच्या जागेवरुन उठवल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित महिलेला कथितरित्या तिच्या जागेवरुन दसऱ्या जागेवर बसण्यास सांगण्यात आल्याचा दावा एका महिलेनं केला आहे. तर, तेलंगाणामधील मंत्री के.टी. रामाराव यांनी विमान वाहतूक कंपनीला इशारा दिला आहे. विजयवाडा ते हैदराबाद प्रवास करणाऱ्या एका महिलेला इंग्रजी आणि हिंदी भाषा येते का विचारण्यात आलं मात्र त्या दोन्ही भाषा येत नसल्यामुळं सुरक्षेचं कारण देत तिला दुसरीकडे बसवण्यात आल्याचा दावा करणारं ट्विट एका महिलेनं केलं. यानंतर या महिलेच्या ट्विटवरुन अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. इंडिगो कंपनीविरुद्धल देखील प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. आयआयटी ची प्राध्यापक देवस्मिता चक्रवर्ती यांनी १७ सप्टेंबरला एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी इंडिगो ६ ई ७२९७ या विमानानं १६ सप्टेंबरला विजयवाडा ते हैदराबादच्या प्रवासातील अनुभव व्यक्त केला आहे. एक तेलुगू महिला प्रवास करत असता तिला हिंदी किंवा इंग्रजी येत नाही म्हणून जागा बदलून त्या महिलेला एक्झिट रोवरील मागच्या बाजूची जागा देण्यात आली, असा दावा देवस्मिता चक्रवर्ती यांनी केला. संबधित महिलेला इंग्रजी किंवा हिंदी समजत नाही हा सुरक्षेचा मुद्दा असल्याचं म्हणत दुसऱ्या जागेवर बसवलं.एका हिंदी भाषिक नसलेल्या व्यक्तीला त्याच्याच राज्यात दुय्यम नागरिक म्हणून वागवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तेलंगाणाचे मंत्री भडकले तेलंगाणाचे मंत्री के.टी. रामाराव यांनी या प्रकरणी देवस्मिता चक्रवर्ती यांचं ट्विट पुन्हा ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी इंडिगो एअरलाइनला इशारा दिला आहे. इंडिगोनं स्थानिक भाषांचा सन्मान करावा, असा थेट इशारा के.टी.आर यांनी दिला आहे. स्थानिक भाषा बोलणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यास सुरुवात करा, असं रामाराव म्हणाले. स्थानिक, घरगुती विमान फेऱ्यांमध्ये ज्याला स्थानिक भाषा बोलता येतील त्यांना नोकरी द्या, त्यामुळं समस्या सुटतील असं केटीआर म्हणाले. इंडिगो एअरलाइन कंपनीनं याबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलं नाही. संबंधित महिलेसोबत घडलेल्या प्रकारानंतर इंडिगो कंपनीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, इंडिगो कंपनीकडून त्यंची बाजू स्पष्ट करण्यात आलेली नाही. इंडिगोची बाजू समोर येताच त्यांची बाजू देखील वाचकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.