
काही नेते इतिहास घडवितात, तर काही इतिहासाला कलाटणी देतात. या दोन्ही गोष्टी साध्य करणारे खूपच कमी; मिखाइल त्यांपैकी एक. दुसऱ्या महायुद्धानंतर तब्बल चार दशके सुरू असलेले शीतयुद्ध जवळ जवळ एकहाती संपुष्टात आणणारे गोर्बाचेव्ह (वय ९१) यांचे काळाच्या पडद्याआड जाणे ही म्हणूनच महत्त्वाची घटना ठरते. विसावे शतक रक्तरंजित होते. त्या शतकाच्या पूर्वार्धातच दोन महायुद्धे झाली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर तब्बल चार दशके शीतयुद्ध चालले होते. भांडवलशाही आणि साम्यवादी या देशांत प्रामुख्याने युरोप व काही प्रमाणात जगही विभागले होते. या दोन जगतांतील शीतयुद्धाने शस्त्रास्त्र स्पर्धा तीव्र झाली होती. एकमेकांच्या विरोधात क्षेपणास्त्रे रोखली गेली होती, अण्वस्त्रांत भर पडत होती आणि स्पर्धा अवकाशातही गेली होती. असे हे शीतयुद्ध रोखण्यात कळीची भूमिका बजावत, गोर्बाचेव्ह यांनी इतिहासाला नवे वळण दिले. साम्यवादी सोव्हिएत संघाचे नेतृत्व करताना त्यांनी राजकीय आणि आर्थिक सुधारणा केल्या. 'ग्लासनोस्त' आणि 'पेरेस्त्रोइका' या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या सुधारणांनी सोव्हिएत संघात नवे वारे वाहिले खरे; परंतु यामुळे खुद्द सोव्हिएत संघाच्या विघटनाची आणि पूर्व युरोपमधील साम्यवादी देशांतील राजवटी कोसळण्याची प्रक्रिया सुरू झाली. बर्लिनची भिंतही लोकांनी पाडली आणि पूर्व-पश्चिम विभागलेल्या जर्मनीचे एकीकरण झाले. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस घडलेल्या या घडामोडींनी युरोपचा नकाशा बदलला. सोव्हिएत संघ अस्तंगत झाला; त्यामधून अनेक देश फुटून बाहेर पडले. यामुळे अमेरिका आणि युरोपीय देशांत लोकप्रिय ठरलेले गोर्बाचेव्ह मायदेशात मात्र रोषाला कारणीभूत ठरले. त्यांच्या मृत्यूनंतरच्या श्रद्धांजलींतूनही ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. गोर्बाचेव्ह यांच्यामुळे इतिहासाने वळण घेतले खरे; परंतु त्यांनी हे काही ठरवून केले नाही. प्राप्त परिस्थितीतून ते मार्ग काढत गेले. सोव्हिएत संघाची राजकीय व्यवस्था ही भांडवलवादी लोकशाहीपेक्षा कशी चांगली आहे, हे विषद करणारा शोधनिबंध पदवी अभ्यासक्रमाला लिहिणारे गोर्बाचेव्ह यांनी साम्यवादी पक्षात एकेक पायरी चढत थेट सरचिटणीसपदापर्यंत धडक मारली. सन १९८४मध्ये ते या पदावर आले; त्या वेळी महासत्ता असलेल्या सोव्हिएत संघाची स्थिती नाजूक होती. अर्थव्यवस्था डळमळीत होती, संरक्षणावरील खर्च वाढला होता आणि अफगाणिस्तानातील मोहीम अपयशी ठरत होती. यातून मार्ग काढण्यासाठी सुधारणांचा मार्ग अवलंबण्याखेरीज त्यांना पर्याय नव्हता. देशभर प्रवास करीत, लोकांमध्ये फिरत, त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी सुधारणांचा पहिला टप्पा आणला. त्याच्याच जोडीने त्यांनी लेखक आणि पत्रकारांवरील निर्बंध हटविले. पोलादी पडदा किलकिला झाला. यामुळे सोव्हिएत संघातील गुन्हेगारी, भ्रष्टाचार, गरिबी, बजबजपुरी यांसारख्या विषयांवर लोक बोलू लागले. सन १९८६मध्ये त्यांनी अफगाणिस्तानातून फौजा काढून घेण्याचे संकेत दिले. त्यानंतर वर्षभरातच त्यांनी पूर्व युरोपातील साम्यवादी देशांना त्यांचा मार्ग खुला असल्याचे वक्तव्य केले. राजकीय सुधारणांमध्ये त्यांनी नव्या संसदेची कल्पना मांडली. सरकार हे पक्षाला नव्हे, तर संसदेला उत्तरदायी असावे, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले. यामुळे दैनंदिन कामकाजातील पक्षाचा हस्तक्षेप थांबणार होता. या सर्व सुधारणांची परिणती पूर्व युरोपातील साम्यवाद कोसळण्यात आणि सोव्हिएत संघाच्या विघटनात झाली. गोर्बाचेव्ह यांना सुधारणा, प्रामुख्याने आर्थिक सुधारणा पूर्णपणे राबविता आल्या नाहीत. राजकीय सुधारणा करतानाही त्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागले. विशेषत: नोकरशाहीचा अडथळा मोठा होता. यामुळे साम्यवादाची पकड कायम राहिली. राजकीय सुधारणांनंतर सोव्हिएत संघाचे ते पहिले आणि शेवटचे अध्यक्ष बनले. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर आणि सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर जागतिक राजकारणाचा नवा प्रवाह सुरू झाला; मात्र गोर्बाचेव्ह यांना आपल्याच देशात काहीशा अवहेलनेला सामोरे जावे लागले. मध्य आशियाई देश सोव्हिएत संघातून फुटल्यानंतर, रशियाचे महासत्तापद गेले. सुरुवातीला गोर्बाचेव्ह यांच्याप्रमाणेच आपणही उदार असल्याचे दाखविणारे बोरिस येल्त्सिन यांनी रशियाचे राजकारण वेगळ्या दिशेने नेले. गोर्बाचेव्ह यांच्यामुळे सोव्हिएत संघाची झालेली स्थिती पाहून चीनने पोलादी पडदा बळकट करण्यासाठी पावले उचलली. आता रशियाही त्याच मार्गाने जात आहे. सोव्हिएत संघ असतानाच्या सीमा पुन्हा आणण्याचा प्रयत्न रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन करीत आहेत. रशियाला पुन्हा एकदा महासत्ता करण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेले पुतिन यांनी म्हणूनच युक्रेनच्या विरोधात युद्ध सुरू केले आहे. जगाला शीतयुद्धाच्या छायेतून बाहेर काढणारे गोर्बाचेव्ह यांचे जाणे यामुळे अधिकच अधोरेखित होणारे आहे.