
म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : सोने तस्करीचे मुंबई हे केंद्र झाल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अलीकडच्या कारवायांतून स्पष्ट झाले आहे. डीआरआयने एकाचवेळी तीन ठिकाणी कारवाई करुन तब्बल ६५ किलो सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. मुंबईत समुद्रामार्गे तस्करीच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. तपास यंत्रणा सतर्क असल्याने ही तस्करी पकडली जाते. त्यामुळे तस्करांनी अन्य सीमांचा आधार घेत भारतात तस्करी सुरू केली आहे. अन्य भागातून छुप्या मार्गाने सोने मुंबईत आले व त्यानंतर ते देशात वितरित केले गेल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे तीन ठिकाणी एकाचवेळी छापा टाकण्यात आला. त्यात मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात डीआरआयला यश आले आहे. डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, या बिस्किटांची मिझोरामच्या सीमेवरुन तस्करी झाल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे ‘ऑपरेशन गोल्ड रश’ ही मोहीम सुरू करण्यात आली. हे सोने मिझोरामहून स्थानिक कुरिअर कंपनीमार्फत मुंबईत आणले गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुप्त माहितीच्याआधारे भिवंडी येथे छापा टाकण्यात आला. त्यामध्ये १०.१८ कोटी रुपये किमतीची १९.९३ किलो वजनी १२० बिस्किटे जप्त करण्यात आली. त्या ठिकाणी संबंधितांना ताब्यात घेऊन विस्तृत चौकशी करण्यात आली असता या तस्करीचा संबंध दिल्ली, पाटणा येथेदेखील असल्याचे बाहेर आले. त्यानुसार दिल्ली व पाटणा येथे छापा टाकण्यात आला. त्यामध्ये पाटण्याहून १४.५० कोटी रुपये किमतीची २८.५७ किलो वजनी १७२ तर दिल्लीहून ८.६९ कोटी रुपयांची १६.९६ किलो वजनी १०२ सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. या सर्वांची एकूण किंमत ३३.४० कोटी रुपये आहे. देशभरात तस्करी झालेले सोने मुंबईत येऊन येथूनच तिकडे धाडले जात असल्याचे दिसून येत आहे.