
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: नाविक व खलाशांनो इराणला जाताना सावध राहा, असा इशारा खलाशांच्या संघटनेने दिला आहे. तेथे खलाशांना वेतन न देता पकडून ठेवले जात असल्याच्या तक्रारी येत असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. करोना संकट मागे सरल्याने विविध क्षेत्रे झपाट्याने वाढत आहेत. यामुळेच नाविक व खलाशी श्रेणीत मागणी वाढती आहे. दोन वर्षे रोजगारापासून वंचित असलेले तरुण मोठ्या प्रमाणात खलाशी म्हणून व्यापारी जहाजांद्वारे परदेशात जात आहेत. पण परदेशात गेल्यावर त्यांना तेथे पकडून ठेवले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याबाबत खलाशांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ऑल इंडिया सीफेअरर्स युनियनने सजग राहण्यास सांगितले आहे. इराणला जहाजावर गेलेल्या खलाशांकडून विनावेतन काम करून घेतले जाते. तसेच त्यांना परतदेखील सोडले जात नाही. अनेकदा पासपोर्ट काढून घेतला जातो. त्यामुळे जहाजावर भरती करणाऱ्या कंपनीबाबत व इराणला जाताना जागरूक असावे, असे युनियनने म्हटले आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओदेखील युनियनने ट्विटरवर पोस्ट केला आहे. लिबियात अडकलेला खलाशी परतला लिबियामध्ये अडकलेला खलाशी मायदेशात सुखरूप परतला आहे. रोशन राज असे त्याचे नाव आहे. ‘द मेरिटाइम युनियन ऑफ इंडिया’ने (एमयूआय) रोशनला परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जहाजाच्या मालकाने आर्थिक कारणांमुळे मालवाहू जहाज सोडून दिल्याने रोशन राज लिबियातील मिसराता बंदरात जहाजात १९ जानेवारी २०२२पासून अडकला होता. तेव्हापासून रोशनला मालकाने वेतनदेखील दिलेले नाही. ‘या काळात रोशनला अनेक वेदना सहन कराव्या लागल्या. त्याला परत आणण्यासाठी शिपिंग महासंचालकांसह भारतीय दूतावास, ट्युनिसमधील चान्सरी प्रमुख यांच्याशी संपर्क साधण्यात आला. ट्युनिशिया हा लिबियाचा शेजारी देश आहे. त्यांनी मदत केली’, असे ‘एमयूआय’चे कॅप्टन तुषार प्रधान यांनी सांगितले.