शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात घुसखोरी नको, कार्यकर्त्यांची पळवापळवी थांबवा; भाजपच्या वरिष्ठांकडून आदेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 25, 2022

शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात घुसखोरी नको, कार्यकर्त्यांची पळवापळवी थांबवा; भाजपच्या वरिष्ठांकडून आदेश

https://ift.tt/9Kw40Cy
मुंबई: भाजपने शिंदे गटाची साथ घेऊन राज्यात सरकार स्थापन केले असले तरी काही ठिकाणी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरु असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले आहे. या सगळ्यातूनच शिंदे गट आणि भाजपकडून परस्परांचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या गळाला लावण्याचे उद्योग सुरु आहेत. या राजकीय स्पर्धेतून शिंदे गट () आणि भाजपमध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून () एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी आपल्या सर्व मंत्री आणि नेत्यांना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि नगरसेवक फोडू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात घुसखोरी करु नका, असे निर्देशही भाजपच्या नेत्यांना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. जेणेकरून या फोडोफाडीचे रुपांतर संघर्षात होणार नाही, याची काळजी नेतृत्त्वाकडून घेतली जात आहे. आगामी काळात राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यादृष्टीने कायम 'इलेक्शन मोड'मध्ये असणाऱ्या भाजपने इनकमिंगच्या माध्यमातून आपली ताकद वाढवायला सुरुवात केली होती. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि नगरसेवक भाजपकडून गळाला लावले जात होते. शिंदे गटाकडूनही याला चोख प्रत्युत्तर म्हणून भाजपचे कार्यकर्ते फोडले जात होते. परंतु, यामुळे महानगरपालिका निवडणुकांच्यावेळी शिंदे गट आणि भाजपमध्ये वितुष्ट निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळेच आता भाजप नेत्यांनी एक पाऊल पुढे टाकत शिंदे गटाशी एकप्रकारे तह केल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदे गटातील शिवसेना आमदार राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होते. आमच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना निधीची रसद पुरवून त्यांची ताकद वाढवली जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच आम्हाला धोका आहे, असे शिवसेनेतील बंडखोरांचे म्हणणे होते. परंतु, आता भाजपसोबत जाऊनही हाच प्रकार होत असल्यास परिस्थितीत फरक काय पडला, असा प्रश्न उपस्थित झाला होता. शिंदे गट आणि भाजपमधील फोडाफोडीच्या राजकारणाचे भविष्यात नकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकता. त्यामुळेच भाजपने आपले नेते आणि कार्यकर्त्यांना तुर्तास सबुरी बाळगण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे.