शिंदे गटाकडून गदा, तलवार किंवा तुतारी? लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 10, 2022

शिंदे गटाकडून गदा, तलवार किंवा तुतारी? लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार

https://ift.tt/jxtsMp8
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाची भूमिका ठरवण्यासाठी रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली. निवडणूक चिन्हासाठी तलवार, तुतारी आणि गदा या चिन्हांचा विचार सुरू असून, त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला शिंदे गटातील सर्व मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक आयोगाचा हा निकाल अंधेरी पोटनिवडणुकीकरीता असल्याने त्यानंतर ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. दोन्ही गट ठाम कल्याण : निवडणूक विभागाकडून शिवसेना हे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले आहे, मात्र सत्तेची सूत्रे केंद्रातून फिरवली जात असल्याने चिन्हाचा निर्णय आपल्याविरोधात जाण्याची शक्यता ठाकरे गटाकडून गृहीत धरण्यात आली होती. यामुळे निर्णय आल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट मात्र ठाम असून कोणत्याही परिस्थितीत आपण लढणार आणि जिंकणार, हा विश्वास दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे, मात्र सामान्य मराठी माणसाकडून या निर्णयानंतर संताप व्यक्त होत आहे. मराठी माणसाच्या शिवसेनेचे या निर्णयाने तुकडे झाल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. निवडणूक विभागाकडून दोन्ही गटांना जे नाव आणि चिन्ह दिले जाईल, ते चिन्ह अल्पावधीत आपल्या मतदारांपर्यत पोहोचवणे सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज शक्य आहे. यामुळे चिन्ह बदलले किंवा पक्षाचे नाव बदलले तरी आम्ही शिवसैनिकच असून आपल्या नेत्यासाठी आपण अखेरपर्यंत लढणार असल्याचा विश्वास स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. स्थानिक पातळीवरच्या राजकारणात वर्षानुवर्षे निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची प्रभागात आपली हक्काची मते असतात. हे मतदार तो उमेदवार जिथे जाईल तिथे त्यांच्यासोबत असतात. यामुळे पक्षबदल किंवा पक्षांतर यामुळे फारसा फरक पडत नाही. विजयासाठी अपेक्षित असलेल्या मताची संख्या कमी किंवा जास्त होत असली तरी त्याने फारसा फरक पडत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे वरिष्ठ पातळीवर घडलेल्या राजकारणाचा आपल्याला फरक जाणवणार नसल्याचे मत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून व्यक्त केले जात आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्याशी संपर्क साधला असता पक्षासाठी आपण आधीही लढत होतो आताही लढणार. यामुळे जो निर्णय होईल तो शिवसैनिक म्हणून प्रत्येकजण स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.