मुंबईत वीजचोरी सुसाट, पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल; बेस्ट, टाटा, अदानीकडून तक्रारी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 10, 2022

मुंबईत वीजचोरी सुसाट, पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल; बेस्ट, टाटा, अदानीकडून तक्रारी

https://ift.tt/NcvRx39
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मागणीच्या तुलनेत विजेची कमतरता आणि त्यातच 'ऑक्टोबर हीट'मध्ये विजेची मागणी वाढण्याची शक्यता असतानाच वीजचोरीचा मोठा प्रश्न कंपन्यांना भेडसावत आहे. मुंबईसारख्या शहरांमध्येही वीजचोरीचे प्रमाण वाढले असून, गेल्या आठवडाभरात वीजचोरीचे वीसपेक्षा अधिक गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. बेस्ट, टाटा, अदानी अशा सर्वच कंपन्यांच्या तक्रारी येत असून, त्यानुसार भारतीय विद्युत कायद्यान्वये हे गुन्हे दाखल केले जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. उपनगरांमध्ये विशेषतः पूर्व उपनगरांत वीजचोरीचे प्रमाण अधिक असून, सर्वाधिक गुन्हे अदानी कंपनीच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आले आहेत. मुंबईत वीजचोरीचे प्रमाण वाढत असल्याने वीज कंपन्यांच्या दक्षता पथकांनी विशेष मोहीम हाती घेतल्या आहेत. एकट्या देवनार भागात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तब्बल आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोवंडी येथील इंडियन ऑइलजवळच्या वस्तीमध्ये अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये कोणतीही अधिकृत जोडणी न करता चोरी करून वीज वापरली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अदानी कंपनीच्या दक्षता अधिकाऱ्यांनी या परिसरात छापा टाकला. ११ जण वीज चोरी करीत असल्याचे निर्दशनास येताच, त्यांची वीज तोडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गोवंडीच्या टाटानगर परिसरातही अशाच प्रकारे कारवाई करीत जवळपास साडेतीन लक्षणांची वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घरगुती नाही, तर व्यावसायिक वापरासाठी देखील लाखो रुपयांच्या विजेची चोरी केली जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी तर इमारतीच्या बांधकामासाठीही अनधिकृत जोडणी करून वीज वापरली जात होती, असेही कारवाईतून दिसून येत आहे. कुरारमध्ये तर वीज कंपन्यांच्या दक्षता पथकाचा छापा पडणार याची कुणकुण लागताच वीजचोरीसाठी जोडण्यात आलेली वायर काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्याचवेळी वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची वीज चोरी करणाऱ्यावर नजर पडल्याने त्याची चोरी पकडली गेली आणि त्याला पकडून कुरार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वीजचोरीचे गुन्हे - विक्रोळी : सुमारे एक लाख ७२ हजार रुपयांच्या वीज युनिटची चोरी करणाऱ्या दोघांवर गुन्हे - शिवाजीनगर : मीटरमध्ये छेडछाड करून अडीच लाखांची वीज चोरी - सहार : दीड लाखाची वीजचोरी करणाऱ्या तिघांवर गुन्हा - नेहरूनगर : दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात साडेचार लाखांची वीज चोरी करणाऱ्या पाच जणांवर कारवाई - मानखुर्द : सहा जणांकडून दोन लाखांची वीजचोरी - कांदिवली : तीन वेगवेगळया कारवाईत साडेपाच लाखांच्या वीजचोरीप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा