आवाज कोणाचा... दसऱ्यापूर्वीच भारताने बांधले विजयाचे तोरण सामना जिंकत रचला इतिहास - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 3, 2022

आवाज कोणाचा... दसऱ्यापूर्वीच भारताने बांधले विजयाचे तोरण सामना जिंकत रचला इतिहास

https://ift.tt/6upsPhn
गुवाहाटी : दसऱ्याला आता काही तास शिल्लक असले तरी त्यापूर्वीच भारताने विजयाचे तोरण बांधल्याचे पाहायला मिळाले. भारताने विजयासह यावेळी इतिहास रचला आहे. कारण भारताला यापूर्वी अशी कामगिरी कधीच करता आली नव्हती. भारताने या सामन्यातील विजयासह पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेवर घरच्या मैदानात मालिका विजय साकारला आहे. सूर्यकुमार यादवच्या भन्नाट फटकेबाजीच्या जोरावर भारताने २३७ धावांचा डोंगर रचला होता. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग दक्षिण आफ्रिकेला करता आला नाही आणि भारताने सामन्यासह मालिकाही जिंकली. या मालिकेत आता भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. अर्शदीप सिंगने आजच्या सामन्यात पुन्हा एकदा कहर केला. कारण आपल्या पहिल्या षटकातच त्याने दोन विकेट्स मिळवल्या. अर्शदीपच्या या दोन विकेट्समुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. पण त्यानंतर डेव्हिड मिलरने अर्धशतक झळकावले खरे, पण भारताचे आव्हान एवढे मोठे होते की, त्यांच्यापासून विजय मात्र दुरावला होता. त्यामुळे जरी मिलर आणि क्विंटन डीकॉक ही जोडी खेळपट्टीवर असली तरी ते विजय मिळवू शकणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट झाले होते. भारताने यावेळी पैसा वसूल फलंदाजी केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी दमदार फटकेबाजी केली. राहुलने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला आणि आपले इरादे यावेळी स्पष्ट केले. रोहित आणि राहुल यांनी त्यानंतर गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. रोहित शर्मा यावेळी मोठा फटका मारण्यासाठी गेला आणि त्याला आपली विकेट गमवावी लागली. रोहितने यावेळी ३७ चेंडूंमध्ये सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४३ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाला असला तरी राहुल मात्र दमदार फलंदाजी करत होता. राहुलने यावेळी आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतक झळकावल्यावर राहुल जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. राहुलने यावेळी २८ चेंडूंमध्ये २८ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर सूर्यकुमार फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचे चित्रच बदलून टाकले. कारण सूर्याने सुरुवातीपासूनच धडाकेबाज फटकेबाजीला सुरुवात केली. त्यामुळे सूर्याला झटपट धावा जमवता आल्या. सूर्याने यावेळी षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्याने यावेळी फक्त १८ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्याच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने २३७ धावांचा डोंगर उभारत यावेळी विजयाचा पाया रचला. सूर्यकुमारने यावेळी तुफानी फटकेबाजी करत २२ चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६१ धावांची वादळी खेळी साकारली. त्यामुळेच भारताला या सामन्यात सहजपणे मोठा विजय मिळवला आला. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात भारताला बरेच प्रयोग करता येऊ शकतात.