
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळः शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या खासदार आणि कॅबिनेट मंत्री यांच्यातील गटबाजी अजूनही कायम असल्याचे मंगळवारी पुढे आले. मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्ते पाठविताना बॅनवरवर बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्वत:चेच फोटो ठेवले आहेत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना स्थान न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चा वाढली आहे. मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटाने दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने अधिकाधिक कार्यकर्ते जमवित शक्ती दाखविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यभरातून कार्यकर्ते मंगळवारी मुंबईला रवाना झाले. यवतमाळ जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार गवळी आणि मंत्री राठोड यांनीही खासगी ट्रॅव्हल्स, रेल्वे आणि इतर वाहनांमधून कार्यकर्ते पाठविले. या वाहनांवर लावलेल्या बॅनरवर दोन्ही नेत्यांनी एकमेकांना स्थान दिले नाही. दसरा मेळावा बैठकीलाही राठोड आणि गवळी एकत्र दिसल्या नाही. राठोड मंत्री झाल्यानंतर त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. पण, खासदार म्हणून भावना गवळी कधीही दिसल्या नाही. त्यामुळे एका गटात असूनही खा. गवळी आणि राठोड यांचे मनोमिलन होऊ शकले नसल्याची चर्चा यानिमित्ताने होऊ लागली आहे.