'बेस्ट'च्या हलगर्जीमुळे प्रवाशाने गमावला पाय; बसमध्ये चढत असतांनाच घडला प्रकार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 8, 2022

'बेस्ट'च्या हलगर्जीमुळे प्रवाशाने गमावला पाय; बसमध्ये चढत असतांनाच घडला प्रकार

https://ift.tt/GYEI2W8
मुंबई : बेस्टच्या हलगर्जीमुळे पाय कापला जाण्याची वेळ नुकत्याच निवृत्त झालेल्या ५९ वर्षीय सुरेंद्र शिंदे यांच्यावर आली. त्यांच्या पायावर दोनवेळा शस्त्रक्रिया करावी लागली. या घटनेस १८ नोव्हेंबर रोजी एक महिना पूर्ण होईल. मात्र बेस्ट प्रशासनाने त्यांची अथवा नातेवाइकांची भेट घेण्याची संवेदनशीलता दाखवली नाही असा संताप शिंदे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. सुरेंद्र यांचे भाऊ संतोष शिंदे यांनी बेस्टच्या गाड्याची स्थिती, डागडुजी व दुरुस्ती यासंदर्भात फेरतपासणीप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. बेस्ट प्रशासनाच्या हलगर्जीमुळे झालेल्या या अपघातासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्टच्या संबधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी शिवडी येथे बेस्टच्या बसमध्ये चढत असताना हा अपघात झाला. बस मार्ग क्रमांक ४५ (बस क्रमांक एमएच०१ सीआर ३५०५) बॅकबे रेक्लेमेशन आगारातील बसच्या मागील दरवाज्याचा पत्रा फाटलेला होता. या पत्र्यामध्ये सुरेंद्र यांचा डावा पाय अडकला, त्याचवेळी गाडीला अचानक ब्रेक मारल्यामुळे चाकाचा वरील भाग व त्यातील पोकळीमध्ये अडकून संपूर्ण पाय कापला गेला. पोलिसांनी त्यांना त्वरित केईएम रुग्णालायमध्ये नेले. मात्र खूप रक्त गेल्याने त्यांच्या जिवावर बेतले होते. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा डावा पाय गुडघ्याच्या खाली कापण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी शस्त्रक्रिया रुग्णालयामध्ये करण्यात आली. ही बस प्रवासी वाहतुकीसाठी २०१९ पर्यंत वैध होती. त्यानंतर ती वैध असल्याची केवळ नोंद आहे, प्रत्यक्षात मात्र बसचे पत्र फाटलेले व बाहेर आलेले होते. प्रवासी वाहतुकीसाठी ही बस सुरक्षित नसताना ती का वापरात आली असा प्रश्न संतोष शिंदे यांनी उपस्थित केला आहे. बस फिट असल्याचे प्रमाणपत्र देताना या सर्व बाबी बघितल्या जात नाहीत का याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. बेस्ट प्रशासनाकडे यासंदर्भात माहिती मागितली असता अपघात तसेच वाहतूक विभागाकडे या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात आले.