
मुंबई : गोवर संसर्गाची तीव्रता मुंबईमध्ये वाढत असून ऑक्सिजनवर असलेल्या बाधित बालकांची संख्या सहा असल्याचे पालिकेने सोमवारी स्पष्ट केले. एम पूर्व विभागामध्ये एमआर-१ लस दिलेल्या बालकांची संख्या १,२६१ इतकी असून एमएमआर लस दिलेल्या मुलांची संख्या १,०५४ असल्याचे पालिकेने सांगितले. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ताप व पुरळ ही लक्षणे १ ते ४ वयोगटामध्ये ४९३ बालकांमध्ये, पाच ते नऊ वर्षे वयोगटामध्ये १६२ मुलांमध्ये दिसत आहेत. ९ ते ११ महिन्यांतील १०५, तर शून्य ते आठ वयोगटातील ९९ मुलांमध्ये या दोन्ही लक्षणांचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येते. पंधरा वर्षांवरील सहा अशा एकूण ९०८ मुलांमध्ये गोवरच्या लक्षणांची नोंद झाली आहे. सोमवारी १२ मुलांची या दोन्ही लक्षणांसाठी नोंद करण्यात आली. गोवर रुबेलाच्या लसीकरणाकडे योग्य वेळी लक्ष न दिलेल्या मुलांमध्ये आजाराची तीव्रता वाढली तर न्यूमोनियाचा त्रास बळावू शकतो. त्यामुळे पालिकेसह राज्य सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याची गरज बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.