मुंबई (योगेश बडे) : कोकण रेल्वेमार्गावरील गाडी क्रमांक १२०५१/२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेससह (२०९३१-२) इंदोर-कोच्चुवेली आणि (१९२५९-६०) भावनगर कोच्चुवेली या गाड्या आता विजेवर धावणार असल्याचे कोकण रेल्वेने मंगळवारी जाहीर केले. कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. विद्युत इंजिनाच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने डिझेल इंजिनावर धावणाऱ्या गाड्या विद्युत इंजिनावर धावणार आहेत. सध्या कोकण रेल्वेवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा एकूण ५० रेल्वेगाड्या धावतात. यापैकी १५ रेल्वेगाड्या विद्युत इंजिनवर धावत आहेत. आज, बुधवारपासून जनशताब्दी एक्स्प्रेसदेखील विद्युत इंजिनावर मार्गक्रमण करणार आहे. ११ नोव्हेंबरपासून इंदोर-कोच्चुवेली आणि १५ नोव्हेंबरपासून भावनगर-कोच्चुवेली एक्स्प्रेस विद्युत इंजिनवर धावेल, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली. सध्या दिवा-रत्नागिरी पॅसेंजर, नेत्रावती, एलटीटी गरीबरथ, कोकणकन्या, मांडवी या एक्स्प्रेस गाड्या विद्युत इंजिनावर धावत आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व रेल्वेगाड्या विद्युत इंजिनावर चालवण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेवरील सर्व गाड्या विद्युत इंजिनावर धावू लागल्यानंतर डिझेलपोटी येणाऱ्या वार्षिक १५० कोटी रुपये खर्चाची बचत होईल, असे कोकण रेल्वेने म्हटले आहे.