मुंबई : मालाड येथील एका ट्रस्टच्या मालकीच्या भूखंडावरील सुमारे ५६० तर त्याच भूखंडाला लागून असलेल्या दुसऱ्या एका जागेवरील ६०५ झाडांची कोणतीही परवानगी न घेता कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालिकेच्या मालाड येथील पी उत्तर विभाग कार्यालयातील उद्यान खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून या दोन्ही भूखंडांचे मालक आणि रखवालदारांवर दिंडोशी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. () मालाड पूर्वेकडील नागरी निवारा परिषदेच्या बाजूला असलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याची तक्रार येथील एका स्थानिक नागरिकाने पालिकेच्या पी उत्तर विभाग कार्यालयात केली. यावर पालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता मेसर्स दिनशॉ ट्रस्ट आणि मेसर्स फेरानी हॉटेल्स कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीच्या भूखंडावरील जुन्या झाडांची कत्तल करण्यात आल्याचे दिसून आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बारकाईने मोजमाप केले असते जवळपास ५६० झाडे बुंध्यापासून कापण्यात आल्याचे निदर्शनास आले. यासाठी पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मालक, रखवालदार आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. आणखी एक वृक्षतोड उघडकीस बेकायदा वृक्षतोडीचा आणखी एक प्रकार याच परिसरातून समोर आला आहे. याच परिसराला लागून असलेल्या जंगल परिसराला सन २०१८मध्ये आग लागली होती. याचा फायदा घेत झाडे तोडण्यात आल्याच्या तक्रारी आल्या होत्या. अधिकाऱ्यांनी इन्फिनिटी आयटी पार्कशेजारी असलेल्या भूखंडाची पाहणी केली असता, या ठिकाणी असलेली ३१० साग, २१८ शेवर आणि पळस जातीची ७७ अशी सुमारे ६०५ झाडे विनापरवानगी कापल्याचे दिसून आले. २०१८च्या या घटनेनंतर आता २०२२मध्ये या प्रकरणात भूखंडाचे मालक तसेच रखवालदारांवर महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.