
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर असतानाच मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात नाराजी दिल्ली दरबारी व्यक्त केली असल्याची माहिती हाती आली आहे. नाराजी दूर करण्यासाठी जगताप गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसल्याचेही समजते. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसला शक्तिप्रदर्शनाची सुवर्णसंधी होती. मात्र काही ठराविक अपवाद वगळता या संधीचे सोने करण्यात मुंबई काँग्रेसला अपयश आल्याची टीका पक्षाच्या काही बड्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणत्याही ठोस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत नसल्याची खंत मुंबई काँग्रेसच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसच्या नेत्यांची ही नाराजी दिल्ली दरबारीही पोहोचली आहे. दिल्लीतील काही वरिष्ठ नेते भारत जोडोच्या यात्रेच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आले असता अनेकांनी जगताप यांचे कान टोचल्याची माहितीही सूत्रांनी दिली.