
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील एका मैदानावर खेळत असताना एका स्पर्धेदरम्यान पंधरा वर्षीय मुलाच्या चेहऱ्यात आर्चरी खेळातील बाण घुसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून चिमुरड्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत गणेश दहली नामक विद्यार्थी हा दर्यापूर येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत होता. यावेळी समवयस्कर अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रशिक्षणाच्या मार्गदर्शनात सराव करत होते. दरम्यान, वेदांत इथे उभा असताना लांबून मारलेला बाण त्याच्या चेहऱ्यावर डोळ्यापासून अगदी काही अंतरावर गालात खूपसला गेला. यामुळे सुमारे एक ते दीड इंच खोल जखम झाली. दरम्यान, मैदानावर उपस्थित असलेल्या प्रशिक्षकांनी वेदांतला रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्या चेहऱ्यातून तीर काढला आणि त्याच्यावर उपचार केले.