
हिंगोली : सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक विद्यार्थी एमपीएससी परीक्षेसाठी वर्ष-वर्ष मेहनत घेतात. काही विद्यार्थ्यांना यश मिळतं तर काहींच्या पदरी अपयश येतं. पण काहींना परिस्थितीने एवढं हिम्मतवान बनवलेलं असतं की ते काही केल्या हरत नाहीत. हिंगोली जिल्ह्यातील साखरा गावच्या शेतकरी कुटुंबातील मुलीने आपल्या मेहनतीच्या जोरावर MPSC परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. असं तिचं नाव... तिने फक्त परीक्षाच पास केली नाही तर राज्यात कर निरीक्षक म्हणून सहावा क्रमांक पटकवला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या २०२१ च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात हिंगोली जिल्ह्यातील साखरा येथील विद्या अंकुश कांदे हिने घवघवीत यश मिळवलं आहे. एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या एसटीआय परीक्षेचा निकाल लागला. यात विद्याने घवघवीत यश मिळवलं. २०२१ ला विद्याने ही परीक्षा दिली होती. विद्याच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सुरुवातीपासूनच शिक्षणात हुशार विद्याचे प्राथमिक शिक्षण साखरा गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. नंतर ११ वी १२ वी चे शिक्षण तिने परभणी येथील नवोदय विद्यालयात पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती साखरा येथे ग्रामीण डाक सेवक या पदावर कार्यरत आहे. ही नोकरी करत तिने अभ्यास सुरु ठेवला. दोन-तीन वर्षाच्या अथक मेहनतीनंतर अखेर यशाने तिच्यासमोर पिंगा घातला. महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक पदावर तिची निवड झालीये. महाराष्ट्रातूनही मुलींमधून तिने सहावा क्रमांक पटकावला आहे. विद्याच्या या यशामागे तिच्या भावाचा सिंहाचा वाट राहिला. विद्या लहान असताना तिचे वडील वारले. आईने काबड कष्ट करून मुलाबाळांना शिकवले. मात्र जशी मुलं मोठी होत गेली तसा शिक्षणाचा खर्च देखील वाढला. विद्याचा भाऊ विकासने प्रसंगी स्वत:चं शिक्षण मागे ठेवलं पण बहिणीला शिकविण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. विद्यानेही भावाला निराश केलं नाही. त्याच्या त्यागाचं स्मरण ठेऊन तिने अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. सातत्यपूर्ण मेहनतीपुढे यशाने पिंगा घातला एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. काही विद्यार्थ्यांना यश मिळते तर काही विद्यार्थ्यांच्या पदरी अनेकदा वर्षानुवर्ष मेहनत करुनही अपयश येतं. सरकारी अधिकारी व्हावे, अशी अनेक तरुण-तरुणींची इच्छा असते. पण परिस्थितीला कारण न बनविता सातत्यापूर्ण प्रयत्न केले तर यश मिळतंच, हेच विद्याच्या यशातून अधोरेखित होतं. विद्याचं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.