
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर जिल्ह्यात भयंकर घटना घडली आहे. जिल्ह्यातील खडगपूर स्थानकात थरकाप उडवणारा प्रकार घडला. यानंतर रेल्वे स्थानकात एकच खळबळ माजली. पश्चिम मेदिनीपूरमधील खडगपूरमध्ये रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेले तिकीट निरीक्षक सुजान सिंह त्यांच्या सहाय्यक तिकीट तिकीट निरीक्षकासह फलाट क्रमांक चारवर उभे होते. दोघे पादचारी पुलाजवळ एकमेकांशी बोलत होते. त्यावेळी हायव्होल्टेज तार अचानक कोसळली आणि सुजान सिंह यांच्या डोक्यावर पडली. हायव्होल्टेज तारचा करंट लागल्यानं सुजान सिंह यांच्या डोक्याला आणि शरीराच्या अन्य भागांना गंभीर इजा झाली. सुजान सिंह रेल्वे रुळांकडे पाठ करून उभे होते. तितक्यात त्यांच्या डोक्यावर तार पडली. करंट लागताच सुजान सिंह मागे कोसळले. ते फलाटावरून रेल्वे रुळांवर पडले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. सुजान सिंह यांच्यासोबत बोलत असलेले तिकीट निरीक्षक थोडक्यात बचावले. तार केवळ सुजान सिंह यांच्या डोक्यावर पडली. त्यांच्यासोबत असलेल्या निरीक्षकाला कोणतीही इजा झाली नाही. सुजान सिंह यांच्यासोबत असलेल्या निरीक्षकाला घडलेला प्रकार पाहून धक्काच बसला. त्यांनी घटनेची माहिती आरपीएफ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. सुजान सिंह यांना त्वरित खडगपूर रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेऊन आहे. घटना अवघ्या काही सेकंदांत घडली. त्यामुळे कोणाच्याच काही लक्षात आलं नाही.